उत्तर महाराष्ट्र

नाशिक : लालपरीचे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील खेड्यापाड्यांतून, गावागावांतून लीलया विहार करणारी आपल्या सर्वांची लाडकी लालपरी आता 74 वर्षांची झाली असून, अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. एसटी महामंडळाचा वर्धापन दिन बुधवारी (दि.1) जिल्ह्यातील विभागीय कार्यालयांसह आगार पातळीवरील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रवाशांसह कर्मचार्‍यांना पेढ्यांचे वाटप करण्यात करण्यात आले.

प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजे एसटीने काळानुसार कात टाकली असून, अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत. एसटीने लालपरीपासून सुरू केलेला प्रवास, हिरकणी, शिवनेरी, शिवशाही ते विठाई आणि आता ई-शिवाई असा सुखद टप्प्यावर आणला आहे. त्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येत आहे. वर्धापन दिनानिमित्त बसस्थानक तसेच आगारांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बसस्थानक आणि एसटी बसगाड्यांची विशेष स्वच्छता ठेवण्यात आली होती. बसस्थानकांवर सडा घालून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. काही बसस्थानकांमध्ये झेंडूच्या फुलासह आंब्यांच्या पानांची तोरणे बांधून वातावरण नर्मिती करण्यात आली होती. विशेष म्हणजे एसटी सर्वच कर्मचारी गणवेश परिधान करून उपस्थित होते. दरम्यान, ठक्कर बाजार बसस्थानक येथे झालेल्या कार्यक्रमात प्रभारी विभागीय नियंत्रक मुकुंद कुवर, विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले, कामगार अधिकारी जहारा शेख, वरिष्ठ सुरक्षा दक्षता अधिकारी अजित भारती, दादा महाजन, सतीश मोहड, किरण देशमुख आदी उपस्थित होते.

एसटी म्हणजे केवळ प्रवासी वाहतूक सेवा करणारी यंत्रणा नाही. तर एसटीने सामाजिक बांधिलकी जपत राज्यातील दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत मदतीचा हात दिला आहे. तसेच राज्यातील गोरगरीब आणि वंचित मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे, यासाठी प्रवासात सवलती दिल्या आहेत. – मुकुंद कुवर, प्रभारी विभागीय नियंत्रक, नाशिक.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT