देवळा : भऊर देवळा येथील भऊरचे जवान अविनाश पवार यांच्या कुटुंबियांकडे राष्ट्रध्वज देताना सैन्यदलाचे कर्मचारी. (छाया: सोमनाथ जगताप). 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : जवान ‘अविनाश अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

अंजली राऊत

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
देवळा तालुक्यातील भऊर येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले जवान अविनाश केवळ पवार (३१) यांच्यावर आजारी असल्याकारणाने उपचार सुरू असतानाच शुक्रवार (दि.९) रात्री निधन झाले. शनिवार (दि.१०) रोजी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी भऊर येथे शासकीय इतमामात रात्री ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी 'अविनाश अमर रहे' च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

अविनाश यांनी २०११ मध्ये २६ मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियन मध्ये भरती होत सैनिकी सेवेस प्रारंभ केला. सध्या त्यांची पोस्टींग जम्मू येथे असतानाच तब्येत बिघडल्याने त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर जबलपूर येथील कमान हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यात आल्यानंतर थोडे बरे वाटल्याने एका महिन्याच्या सुटीवर ते मूळ गावी घरी आले. या दरम्यान पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने पुणे मिलिटरी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. वसाकाचे माजी कामगार संचालक राजेंद्र पवार यांचे ते पुतणे होत. घटनेचे वृत्त कळल्यापासून गाव व कुटुंबीय शोकसागरात होते. सायंकाळी साडेसात वाजता सैन्यदलाच्या पथकासह पार्थिव गावात येताच परिवाराचा दुःखाचा बांध फुटला. मात्र तरीही गावाचे सुपुत्र देशसेवा करत असतांना कामी आले. याचे दुःख व अभिमान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. गावाच्या या सुपुत्राला निरोप देण्यासाठी सजवलेल्या वैकुंठरथावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्यात ठिकठिकाणी पुष्पचक्र वाहत आदरांजली अर्पण करण्यात आली. गावातील गिरणा नदीच्या किना-यावरील स्मशानभूमीत अविनाश यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अविनाश यांचा पाच वर्षांचा मुलगा शिव पवारने अग्निडाग दिला. यावेळी सैन्यदलाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मानवंदना दिली. आमदार डॉ. राहुल आहेर, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी भ्रमणध्वनीवरून सहवेदना प्रकट केली तर नायब तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे, शेतकरी संघटनेचे रामचंद्र बापू पाटील, तलाठी नितीन धोंडगे, ग्रामविकास अधिकारी एकनाथ गावित, सरपंच दादा मोरे सोसायटीचे अध्यक्ष अभिमन पवार, पोलीस पाटील भरत पवार, तंटामुक्त अध्यक्ष नितीन पवार, माजी चेअरमन काशिनाथ पवार, प्रहार संघटनेचे शाखाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह वैद्यकीय, कृषी, संरक्षण, व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अविनाश यांना मानवंदना देण्यासाठी सैन्यदलाचे सुभेदार विरेंदरसिंग, हवालदार सौरभकुमार, हरपाल, नायक पुलाक, सागर पवार, देविदास पवार यांच्यासह इतर जवान आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT