रत्नागिरी : ‘ऑरेंज अलर्ट’सह किनारी भागात सतर्कता | पुढारी

रत्नागिरी : ‘ऑरेंज अलर्ट’सह किनारी भागात सतर्कता

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर पुन्हा वाढला असून शुक्रवारपासून पाऊस पुन्हा सक्रीय झाला. त्यामुळे पावसाचा परतीचा प्रवास लांबणार असून आगामी चार दिवस कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात आगामी दोन दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

शुक्रवारी जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली होती. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसाने हजेरी लावली. काही भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहतुकीवरही परिणाम झाला. दरम्यान, आगामी दोन दिवस हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टी भागात पावासाचा इशारा दिला आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना हवामान विभागानं पावसाचा ’यलो अलर्ट’ जारी केला आहे. मात्र आगामी दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसलधरा ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून रविवार आणि सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याशी शक्यता वर्तविली आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, रत्नागिरी, महाड, कोकण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Back to top button