कोरेगाव : शेतकरी हा देशाचा कणा आहे : अजित पवार | पुढारी

कोरेगाव : शेतकरी हा देशाचा कणा आहे : अजित पवार

कोरेगाव; पुढारी वृत्तसेवा: शेतकर्‍यांसाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल आडमुठेपणा चालणार नाही, त्यामध्ये तुम्हाला योग्य ते बदल करावे लागतील. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे, तो कणा मोडला तर राज्य बुडेल असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. पेरणे (ता. हवेली) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप वसंत कंद यांच्या पुढाकाराने झालेल्या नोकरी व शेतकरी मेळाव्यात पवार यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले.

राज्यात गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार असताना राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक योजना व विकासाला गती देण्याचे काम करण्यात आले, परंतु शिंदे सरकार येताच विकासकामांना स्थगिती देण्याचे काम चालले आहे, म्हणून आम्ही त्यांना स्थगित सरकार म्हणतो, अशी टीका पवार यांनी केली

या वेळी आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रवक्ते विकास लवांडे, भारती शेवाळे, दिलीप वाल्हेकर, माणिक गोते, प्रकाश म्हस्के, रामभाऊ दाभाडे, राजेंद्र सातव, शिवदास उबाळे, सरपंच रुपेश ठोंबरे, संदेश आव्हाळे,सुनील जाधवराव, सुरेखा भोरडे, लोचन शिवले, उमेश लोखंडे, जयश्री सातव, वसुंधरा उबाळे आदींसह असंख्य कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

अनेक ठिकाणी कारखान्यातील लेबर व स्क्रॅप काँट्रॅक्टसाठी दादागिरी केली जात आहे, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांची दादागिरी मोडून काढा, मग तो कुठल्याही पक्षातील असो किंवा माझ्याशेजारी मांडीला मांडी लावून बसलेला का असेना, ही माझी भूमिका आहे, ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही असणार असल्याचे पवार यांनी सांगितले. प्रदीप कंद यांनी युवकांसाठी राबविलेल्या नोकरी व शेतकरी मेळावा या उपक्रमाबद्दल अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले.

अनेक कार्यकर्त्यांनी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला, अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात शिरूर हवेलीत विकासकामांना मान्यता प्राप्त करून दिलेल्या विकासकामांचा आढावा मांडत आमदार पवार यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

Back to top button