नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील अक्राळे औद्योगिक वसाहतीमध्ये वर्षभरात रिलायन्स लाइफ सायन्सेस व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांनी गुंतवणूक केल्यानंतर आता इतर सुमारे 29 उद्योगांनी गुंतवणूक केली आहे. यामुळे अक्राळे औद्योगिक वसाहतीमध्ये आतापर्यंत 5,700 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, त्या माध्यमातून 4,196 जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी दिली.
नाशिकमधील सातपूर आणि अंबड या दोन औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांसाठी सध्या जागा उपलब्ध नाही. यामुळे भविष्याचा वेध घेत एमआयडीसीने नाशिकपासून अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारली आहे. रिलायन्स लाइफ सायन्सेस या रिलायन्स उद्योग समूहाच्या कंपनीने येथे कोविड 19 च्या काळात बाराशे कोटी रुपये गुंतवण्याचा सामंजस्य करार केला. अलीकडच्या काळात नाशिकमध्ये आलेला हा सर्वांत मोठा उद्योग आहे. या उद्योगासाठी महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीने अक्राळेत 160 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशननेही अक्राळेत 350 कोटींची गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठीही एमआयडीसीने 60 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या दोन मोठ्या उद्योगांच्या गुंतवणुकीमुळे अक्राळे हे उद्योगांसाठी एक आकर्षण केंद्र झाले आहे. यातून या दोन उद्योगांव्यतिरिक्त 29 लहान-मोठ्या उद्योगांनी येथे गुंतवणूक केली आहे.
अक्राळेतील प्रमुख गुंतवणूकदार उद्योग
रिलायन्स लाइफ सायन्सेस 1206 कोटी
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन 350 कोटी
प्लान्सस्केअर प्रोकॉन प्रा. लिमिटेड 925 कोटी
राज इंडस्ट्रिज 165 कोटी
जोगेश्वरी एंटरप्रायझेस 120 कोटी
श्री महालक्ष्मी इंडस्ट्रिज 145 कोटी
पाटील प्लास्ट 405 कोटी
तिरूपती इंजिनिअरिंग 200 कोटी
मोटेक्स ग्लास फायबर लिमिटेड 50 कोटी