

कोल्हापूर; पुढारी डेस्क : राज्याच्या अनेक भागांत गेले दोन दिवस अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा आणि द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूरसह सातारा, महाबळेश्वर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, मुंबई, पुणे परिसरात अनेक ठिकाणी गुरुवारी वादळी वार्यासह पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
सलग दुसर्या दिवशी सातारा शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण तालुक्यांत अवकाळीच्या तडाख्याने पिकांचे नुकसान झालेे असून, गहू व ज्वारीच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. सुगीच्या कामांबरोबरच फळबागांसह आंब्याचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.
गहू, हरभरा, ज्वारी, उन्हाळी घेवडा आदी पिकांच्या काढणीची कामे सुरू झाली आहेत. काढलेले पीक भिजल्याने गहू, ज्वारी काळी पडणार आहे.
अवकाळी पावसाने गुरुवारी (दि. 16) पुन्हा एकदा जिल्ह्यात धुमाकूळ घातला. वादळी वारे, गारांसह झालेल्या पावसाने काढणीस आलेला गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले.
मराठवाड्यात गुरुवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी या भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे रब्बीची पिके आडवी झाली आहेत. हदगाव तालुक्यातील न्हावा येथील गणपत न्हावेकर हे अंगावर वीज कोसळल्याने गंभीर जखमी झाले.
जिल्ह्याच्या काही भागांत गुरुवारी (दि. 16) अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक शहरामध्ये जोरदार पावसासह गारा पडल्या. तसेच येवला व दिंडोरी तालुक्याला विजेच्या कडकडाटासह गारपिटीने झोडपून काढले.