उत्तर महाराष्ट्र

नाशिक : अनियमितता आढळल्यास ‘नाफेड’ची चौकशी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाफेडमार्फत यंदा 2.25 लाख क्विंटल कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खरेदीमध्ये पारदर्शकता असावी, यासाठी कांदा उत्पादक कंपन्या आणि मार्केटिंग फेडरेशनद्वारे निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. पण, खरेदीत काही अनियमितता असल्यास शेतकर्‍यांनी लेखी तक्रार नोंदवावी, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे. तक्रारींची दखल घेऊन चौकशी करण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. 24) ना. पवार यांनी जिल्ह्याचा मान्सूनपूर्व व अन्य विषयांबाबत आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, यंदा कांद्याचे उत्पादन अधिक झाल्याने दर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्राने कांदा निर्यातबंदी लागू न करता, नाफेडमार्फत खरेदीचा निर्णय घेतला. त्यासाठी ऑनलाइन निविदा काढून खरेदी प्रक्रिया राबविली जात आहे. संकेतस्थळावर सर्व ऑनलाइन व्यवहारांची माहिती दिली जात आहे, तरीही शेतकर्‍यांना कांदा खरेदीत अनियमितता आढळल्यास त्यांनी लेखी तक्रार करावी. तक्रारीवरून नाफेडची चौकशी करताना, त्यात दोषी आढळणार्‍यांवर कारवाईचे आश्वासन ना. पवारांनी दिले. जिल्ह्यात खते-बियाण्यांची पुरेशी उपलब्धता आहे. बियाणे व खतांचा काळाबाजार करणार्‍यांवर कारवाईचे आदेश पवारांनी यंत्रणांना दिले. जिल्ह्यात वनपट्ट्यांची प्रकरणे निकाली काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात 75 अमृत सरोवरे – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्ह्यात 75 अमृत सरोवरे साकारण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेने सरोवरांसाठी 50 ठिकाणे निश्चित केली असून, काही भागांत कामेही सुरू झाली आहेत, तर 25 सरोवरांसाठी वनविभागाकडून जागा निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील पाणी साठवणुकीचे स्रोत स्वच्छ करून घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे ना. पवार यांनी सांगितले.

शेतकर्‍यांवर अन्याय नको – वीज थकबाकी भरल्याशिवाय शेतकर्‍यांना ट्रान्स्फार्मर देऊ नये, अशी भूमिका घेणार्‍या राज्य सरकारवर ना. डॉ. पवार यांनी टीकास्त्र सोडले. शेतकरी टप्प्याटप्प्याने बिले भरतो आहे. त्यामुळे अमूक थकबाकी भरल्यावर त्यांना टान्स्फार्मर देणे, ही राज्याची भूमिकाच योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या. जिल्ह्यात 600 ट्रान्स्फार्मरची आवश्यकता असून, शेतकर्‍यांवर अन्याय नको, अशी भावना ना. डॉ. पवार यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT