नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा
ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या चतुर्थ सुप्रमास राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवणाऱ्या सर्व प्रवाही वळण योजनांची अर्धवट कामे तसेच मांजरपाडासह पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण, काँक्रिटीकरण व ओझरखेड डावा कालव्याची अपूर्ण कामे पूर्ण होणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.
ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाला चतुर्थ सुप्रमा मिळावी यासाठी भुजबळ पाठपुरावा करत होते. याबाबत त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे या विषयावर विधानसभेत चर्चा घडवून आणली होती. त्यावेळी लक्षवेधीवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरात या प्रकल्पाला सुप्रमा दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार ना. फडणवीस यांनी विधानसभेत दिलेले आश्वासन पाळल्यामुळे छगन भुजबळ यांनी त्यांचे आभार मानले आहेत. पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणाऱ्या मांजरपाडा (देवसाने) या राज्यासाठी पथदर्शी असलेल्या योजनेसह इतर सर्व प्रवाही वळण योजना, पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी-डोंगरगाव कालवा, ओझरखेड डावा कालव्याचा समावेश ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पामध्ये होतो. या प्रलंबित सुप्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाअंतर्गतची दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा (देवसाने), धोंडाळपाडा, ननाशी, गोळशी महाजे यासह पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवणाऱ्या सर्व प्रवाही वळण योजनांची अर्धवट कामे पूर्ण होणार आहेत. त्याचप्रमाणे पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी- डोंगरगाव कालवा विस्तारीकरण व काँक्रिटीकरण आणि ओझरखेड डावा कालव्याची अपूर्ण कामे मार्गी लागण्यासाठी सदर प्रकल्पाला सुप्रमा मिळणे अत्यंत आवश्यक होती. या प्रकल्पांची अपुरी कामे पूर्ण झाल्यावर प्रामुख्याने दिंडोरी, निफाड, चांदवड आणि येवला या तालुक्यातील जलसिंचनाला फायदा होणार आहे.
येवलेकरांची होणार स्वप्नपूर्ती
ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या चतुर्थ सुप्रमास राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्याने मांजरपाडासह पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण, काँक्रिटीकरण व ओझरखेड डाव्या कालव्याची अपूर्ण कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे कालव्याच्या लिकेजचे प्रश्न मार्गी लागून पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचून येवलेकरांची स्वप्नपूर्ती होणार आहे.