उत्तर प्रदेश |धक्कादायक! मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट होऊन ८ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बरेली (उत्तर प्रदेश) : चार्जिंग मोडवर ठेवलेल्या मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट होऊन एका आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडली आहे. सहा महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या कीपॅड फोनची बॅटरी एका सोलर पॅनेलला जोडलेल्या स्विचमध्ये कनेक्ट केली होती, असे या घटनेची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले.

ही घटना घडली तेव्हा बाळाची आई खोलीत नव्हती. स्फोटाचा मोठा आवाज ऐकून तिने धाव घेतली आणि तिची दुसरी मुलगी नंदिनी हिने मदतीसाठी आरडाओरडा केला. तेव्हा तिला बाळ जखमी अवस्थेत पडलेले दिसले. बाळाला तातडीने रुग्णालयात नेले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की ही घटना पालकांच्या निष्काळजीपणामुळे घडली आहे. अद्याप या घटनेबद्दल कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

सदर मुलाचे वडील ३० वर्षीय सुनील कुमार कश्यप हे फरिदपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पाचोमी गावातील रहिवासी आहेत. ते मजूर आहेत. एका बांधकाम सुरू असलेल्या घरात ते राहतात. तेथे वीज पुरवठा नाही. त्यामुळे ते घरात मोबाईल फोन लाइट आणि चार्ज करण्यासाठी सोलर प्लेट आणि बॅटरीचा वापर करतात. ज्यावेळी मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाला त्यावेळी सुनील कामावर गेले होते. तर त्याची पत्नी कुसूम ही घरी मुलींसोबत होती.

दुपारच्या जेवणानंतर कुसूमने तिच्या मुलींना वेगळ्या खाटावर झोपवले होते आणि तिचा फोन खाटावर ठेवला. "मी शेजाऱ्याशी बोलत होते त्यावेळी माझी मुलगी नंदिनीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. मोबाईलच्या स्फोटामुळे खाट जळून खाक झाला. बाळ यामुळे गंभीर जखमी झाले. मोबाइल फोन माझ्या मुलीसाठी जीवघेणा ठरू शकतो, असे मला कधीच वाटले नव्हते. बाळाला ज्या खाटावर झोपवलं होतं तिथं मोबाईल ठेवायला नको होता," असे सांगत बाळाच्या आईने आक्रोश केला.

सुनीलचा भाऊ अजय कुमार याने सांगितले की आम्ही खूप गरीब आहोत आणि अजूनही कीपॅड फोन वापरतो. USB केबल वापरून फोन चार्ज करायला ठेवला होता. पण अडॅप्टर कनेक्ट होत नव्हता. त्यामुळे त्याचा स्फोट झाला. बाळावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी माझ्या भावाकडे जास्त पैसे नव्हते. अन्यथा त्याचा जीव वाचला असता.

फरिदपूर पोलिस स्टेशनचे अधिकारी हरवीर सिंह म्हणाले की सदर कुटुंबीयाने तक्रार देण्यास नकार दिला आहे. सोपस्कार पूर्ण केल्यानंतर बाळाचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस तपासात असे आढळून आले की लहान मुलगी मोबाईलच्या स्फोटामुळे जखमी झाली. तर तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, हा अपघात होता.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news