उत्तर महाराष्ट्र

नाशिक : खासदार शरद पवार यांच्या हस्ते कादवा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन

अंजली राऊत

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
साखर उद्योग अनेक अडचणींचा सामना करत असताना कादवा कारखाना मात्र श्रीराम शेटे यांच्या पारदर्शी कारभाराने सुस्थितीत आहे. त्यांनी वेळीच निर्णय घेत इथेनॉल प्रकल्प अल्पावधीत सुरू करून आदर्श निर्माण केला आहे. राज्यातील सहकारी संस्थांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. कादवा सहकारी साखर कारखान्याच्या असावणी (डिस्टिलरी) इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खा. देवीदास पिंगळे, आ. माणिकराव कोकाटे, आ. नितीन पवार आ. दिलीप बनकर, आ. नरेंद्र दराडे, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, गणपतराव पाटील, दत्तात्रय पाटील, सदाशिव शेळके, संजय पडोळ आदी उपस्थित होते.

खा. पवार म्हणाले, साखर उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन होत असल्याने साखरेला उठाव नाही. अशा स्थितीत केवळ साखर निर्मिती न करता साखरेपासून विविध उपपदार्थ इथेनॉल बनवले जात आहे. ते आपणही करावे यासाठी आपण प्रयत्न केले. त्यास केंद्र सरकारनेही मान्यता देत चालना दिली. श्रीराम शेटे यांनी वेळीच इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्याने पुढील काही वर्षांत शेतकर्‍यांना निश्चित किमान शंभर रुपये तरी जादा भाव मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका करताना जगात आपल्या देशाची प्रतिष्ठा पंतप्रधान मोदी यांनी वाढवली, असे सांगितले जाते. त्याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु बांगलादेश सारखा देश आमचे द्राक्ष घेणार नसेल तर ती प्रतिष्ठा काय कामाची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माजी मंत्री भुजबळ यांनी राज्य सरकारचे काय चाललेय ते कळत नाही. भाजपने फतवा काढत फक्त भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या शिफारशी असलेल्या नवीन सहकारी संस्था नोंदणी करण्याचा घाट घातल्याने हे अयोग्य असून, या विरोधात आपण विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे सांगितले. विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी जिल्हा बँक कर्जाबाबत शेतकरी अडचणीत आले असून, त्यांच्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे ओटीएस योजना राबविण्यासाठी पाठपुरावा करावा, असे सांगितले. प्रास्ताविकात चेअरमन श्रीराम शेटे यांनी कादवाची वाटचाल विशद करताना खा. पवार यांनी आपल्याला आधुनिकीकरण करण्याचा सल्ला दिला. त्यांच्याच मार्गदर्शनानुसार आपण कामकाज केल्याने कादवा यशस्वी वाटचाल करत असल्याचे म्हटले. यावेळी शेटे यांचे अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त लोकनेता गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. संचालक सुकदेव जाधव यांनी आभार मानले. यावेळी सर्व संचालक, शेतकरी, अधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश सलादे, अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

ईडीची वक्रद़ृष्टी गिरणावर
माजी मुख्यमंत्री भुजबळ यांनी आपणही गिरणा कारखाना चालवायला घेतला होता. पण ईडीने सर्वांत अगोदर त्यावर वक्रद़ृष्टी टाकली. अजूनही त्यांची वक्रद़ृष्टी त्याचेवर आहे. ती वक्रद़ृष्टी निघाली की आपण शेटे यांचे मार्गदर्शन घेत गिरणा चालवू, असे सांगितले.

सुधीर तांबेंना पुढे घ्या!
इथेनॉल प्रकल्पाच्या शुभारंभावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे काहीसे मागे उभे होते. त्यांना बघत खा. पवार यांनी तांबे यांना पुढे घ्या, असे म्हटले. त्यावर आ. माणिकराव कोकाटे यांनी घेतले साहेब.. तर इतरांनी साहेब त्यांना खूप बहुमताने आपण पुढे घेतले, असे सांगितले. त्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT