नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघासाठी गुरुवारी (दि.2) सय्यदपिंप्री येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सकाळच्या सत्रात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यासह सर्वच उमेदवारांचे समर्थक अनुपस्थित राहिल्याने मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी शुकशुकाट होता. मात्र, सायंकाळी ४ वाजेनंतर समर्थकांनी मतमोजणी केंद्र गाठल्याने गर्दी वाढत गेली.
गुलाबी थंडीत बसूनही मतांची आकडेवारी घेण्यात समर्थक व्यस्त होते. भ्रमणध्वनीवरून प्रमुख नेते जय-पराजयाचा अंदाज घेत या जागेचे वेगळेपण समजावून सांगत होते. पासेसवाल्यांनाच मुख्य गेटमधून आतमध्ये सोडण्यात आल्याने मतदान केंद्राच्या समोरच्या मोकळ्या जागेतही समर्थकांना जाता आले नाही. त्यातच सुरुवातीच्या फेऱ्यांचे निकाल पोलिस खात्याच्या नियोजनामुळे अनेकांना ऐकता न आल्याने नाराजी व्यक्त केली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ध्वनिक्षेपकावरून फेरीनिहाय निकाल जाहीर केला. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये सत्यजित तांबे यांनी मोठी आघाडी घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती. तर शुभांगी पाटील यांचे समर्थक सकाळपासूनच तुरळक प्रमाणात मतमोजणी केंद्राबाहेर हजर होते. तांबे यांची फेरीनिहाय आघाडी वाढत गेल्यानंतर पाटील यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राजवळून काढता पाय घेतला.
दरम्यान, तांबे समर्थकांनी मतमोजणी केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित समर्थकांना रस्त्यावर पिटाळून लावले. तिथेही तांबे समर्थकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवत उत्साह दाखविला. अखेर रात्री उशीरा निकाल हाती आला. सत्यजित तांबे यांनी शुभांगी पाटील यांचा पराभव करत नाशिक पदवीधर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला.
प्रमुख नेते-पदाधिकारी अनुपस्थित
दोन्ही गटांच्या उमेदवारांच्या प्रमुखनेते व कार्यकर्त्यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरला. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अर्जुन टिळे तर काँग्रेसचे स्वप्निल पाटील उपस्थित होते. ज्या शिवसेनेने शुभांगी पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळपासूनच मतमोजणी केंद्राकडे पाठ फिरविली होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीही मतमोजणी केंद्राकडे येणे टाळले. भाजप व शिंदे गटाचे प्रमुख नेते व पदाधिकारीही गैरहजर होते.
हेही वाचा :