नगर; पुढारी वृत्तसेवा : वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी निडर पोलिस अधिकार्यांची गरज आहे. काही दिवसांतच पोलिस दलात नवा गडी, नवा राज येणार असल्याने पोलिस ठाण्यांमध्ये रिझल्ट देऊ शकणार्या पोलिस अधिकार्यांनाच प्राधान्य दिले जाणार असल्याचा निर्णय पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घेतला आहे. पोलिस अधिकार्यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ पाहूनच नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे एसपी राकेश ओला यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
गृह विभागातील बदल्या कोरोना काळामुळे महाविकास आघाडी सरकारने पुढे ढकलल्या होत्या. दरम्यान, आता पोलिस दलात बदल्याचे वारे वाहू लागले आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर गृह विभागाकडून पोलिस अधिकार्यांच्या बदल्याचे आदेश काढली जाण्याची शक्यता पोलिस दलातील बड्या अधिकार्यांनी वर्तविली आहे.
नगर तालुका, एमआयडीसी, भिंगार कॅम्प या तिन्ही पोलिस ठाण्यातील अधिकार्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने येथे नवे अधिकारी नियुक्त होतील. कोतवाली आणि तोफखाना या पोलिस ठाण्यातील अधिकार्यांचीही खांदेपालट होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अधिकार्यांच्या बदल्याचे आदेश निघताच घडामोडींना वेग येणार आहे. तत्पूर्वीच, क्रीम ठाणेदारी मिळविण्यासाठी अनेकांनी एसपींकडे इच्छा व्यक्त करण्यास सुरूवात केल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.
शिफारशीलाल अधिकार्यांची गोची
पोलिस दलात बदल्या आणि फेर नियुक्त्या होण्यास लवकरच सुरूवात होणार आहे. यासाठी अनेक अधिकार्यांनी क्रीम पोस्ट मिळावी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे. मात्र, एसपींकडून शिफारशीलाल अधिकार्यांना जास्त भाव दिला जात नसल्याने अशांची गोची झाली आहे.
वाहतूक शाखेकडे लक्ष द्यावे लागणार
शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आहे. शहरातील महत्वाच्या चौकात कायम वाहतूक कोंडी असल्याचे दिसून येते. शहरातून अवजड वाहतुक करणार्यांना देखील रान मोकळे आहे. त्यामुळे वाहतूक शाखेच्या लहरी कारभारावर एसपी ओला काय निर्यय घेतात हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.
एलसीबी अन् कोतवालीसाठी फिल्डिंग
एलसीबी आणि कोतवाली पोलिस ठाण्याचा कारभारी होण्यासाठी अनेकांनी बाशिंग बांधले आहे. अशा अधिकार्यांच्या नावाचीही चर्चा पोलिस दलात रंगत आहे. मात्र, एसपींनी अद्याप कोणालाही ग्रीन सिग्नल दिला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे जास्तच चर्चा झाल्यास नियुक्ती न मिळता, कुठेतरी दूर फेकले जाण्याचीही भीती अधिकार्यांमध्ये आहे. .