उत्तर महाराष्ट्र

नाशिक : जिल्ह्यात सव्वा लाख महिलांंची मोफत आरोग्य तपासणी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नवरात्रोत्सवात आरोग्य विभागाने सुरू केलेल्या 'माता सुरक्षित, तर घर सुरक्षित' मोहिमेंतर्गत आरोग्य तपासणीला 18 वर्षांवरील मुली तसेच महिलांकडून मिळालेला प्रतिसाद लक्षात घेत 26 सप्टेंबरला सुरू झालेली मोहीम 26 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर गरजेनुसार औषधोपचारही केले जात आहेत. आतापर्यंत या मोहिमेमध्ये साधारणपणे सव्वा लाख महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.

नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाने ही मोहीम हाती घेतली असून, त्याची अंमलबजावणी पहिल्या माळेपासून करण्यात आली. फक्त तरुणी व महिलांच्याच आरोग्याची तपासणी करण्याचा हा पहिलाच प्रयत्न राबविला जात असून, त्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. गावपातळीवरील आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय अशा विविध पातळ्यांवर या तपासण्या केल्या जात आहेत.

येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत असलेल्या या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 11 लाख तरुणी व महिलांच्या तपासणीचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. यामध्ये प्रामुख्याने रक्त, लघवी, हिमोग्लोबिन याबरोबरच मासिक पाळींची अनियमितता, गर्भारपणातील त्रास, रक्तदाब, गर्भाशयातील कर्करोग आदींबाबत तपासणी केली जात आहे. यामध्ये आणखी काही आढळून आल्यास त्याबाबत योग्य तो औषधोपचार तसेच पाठपुरावादेखील आरोग्य विभाग करणार आहे. मोहिमेसाठी जिल्ह्यातील 15 तालुक्यांत एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तालुक्याच्या मुख्यालयी असे 28 ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत तपासणी शिबिराची व्यवस्था आहे. जिल्ह्यात 112 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, दाखल रुग्णांवर उपचाराची सोय या आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची विविध पथके कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, महिलांच्या बाळंतपणाची व्यवस्था याठिकाणी सज्ज आहे. जिल्ह्यात सुमारे 592 उपकेंद्रे ही दोन किंवा तीन गावे मिळून एक उपकेंद्र अशा प्रकारात आहे. त्यामुळे लगतच्या गावांमधील महिला, तरुणींची तपासणी याठिकाणी केली जाते. मोहिमेत जिल्हा शासकीय रुग्णालय, चांदवड, त्र्यंबकेश्वर, मनमाड, कळवण आणि येवला या चार उपजिल्हा रुग्णालये यांचा समावेश आहे. तसेच मालेगाव येथील जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालय येथेदेखील ही मोहीम राबविली जात आहे. गावपातळीवर आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथील समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्यसेविका यांच्यामार्फत महिला व भगिनी यांची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तपासणी झालेल्यांची आकडेवारी अशी…
18 वर्षांवरील महिला व भगिनी तपासणी                                1,23,942
वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत गरोदर मातांची तपासणी                   28,013
गर्भधारणापूर्व सेवा कार्यक्रमांतर्गत तपासणी                               27,096
30 वर्षांवरील महिलांचे असंसर्गजन्य आजार तपासणी                  83,504

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT