सातारा : पाऊण लाखापैकी 825 जण बाहेर … स्वस्त धान्य योजनेचा सधन कुटुंबांना लाभ | पुढारी

सातारा : पाऊण लाखापैकी 825 जण बाहेर ... स्वस्त धान्य योजनेचा सधन कुटुंबांना लाभ

उंडाळे;  पुढारी वृत्तसेवा :  गरीब कल्याण योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकार राज्यातील जनतेला स्वस्त धान्य दुकानातून पिवळ्या व केशरी कार्डधारकांना कमी दरात व मोफत धान्य वाटप करते. मात्र या योजनेत अनेक आर्थिक सधन कुटुंबातील व्यक्ती लाभ घेत आहेत. अशा सधन कुटुंबातील व्यक्तींनी या योजनेतून बाहेर पडावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य शासनाकडून देण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही कराड तालुक्यात केवळ 825 लोकांनीच या योजनेतून बाहेर पडण्यास संमती दिली आहे. तालुक्यात सधन कुटुंबांची संख्या तब्बल 75 हजार 706 इतकी असून आता तालुका प्रशासन कोणती भूमिका घेणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

देशातील आर्थिक दुर्बल व गरीब कुटुंबातील लोकांना केंद्र सरकारकडून व महाराष्ट्र शासनाकडून दरमहा कमी दरात (2 रुपये किलो गहू व 3 रुपये किलो तांदूळ) साखर यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. यामध्ये केशरी व पिवळ्या कार्डधारकांना त्याचा लाभ मिळतो. परंतु अलीकडच्या काळात शासनाने गरीब जनतेलाच या शासकीय योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सधन कुटुंबातील व्यक्तीने या योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. पक्के घर, वाहन असणे यासह पगारदार, पेन्शनर, सधन शेतकरी व ज्यांचे उत्पन्न किमान 30 ते 40 हजारापेक्षा अधिक आहे, अशा लोकांनी योजनेतून बाहेर पडत 50 हजार रुपयांचा लाभ घ्यावा, असे घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या गरीब कल्याण योजनेतील धान्य योजनेतून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला आता स्वतःहून व्यक्ती बाहेर पडत नसल्याने शासनाच्या या योजनेला खो बसला आहे.

सर्वसामान्यांच्या सवलतीवरच बडगा का?

केंद्र सरकारसह राज्य शासनाकडून सधन कुटूंबातील व्यक्तींनी स्वस्त धान्य योजनेतून बाहेर पडावे, अशी सक्ती केली जात आहे. मात्र अनेकदा सर्वसामान्य जनतेकडून आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल पण आम्ही बाहेर पडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेताना दिसत आहे. त्यातच मंत्री, आमदार, खासदार, उद्योजक यांना भल्या मोठ्या सवलती दिल्या जातात. मग सर्वसामान्यांना मिळणार्‍या सवलतीवर बडगा का उगारला जातो? असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

पुरवठा विभागाच्या वतीने लवकरच एक विशेष मोहिम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील यासह प्रशासकीय अधिकारी गावोगावी भेट देऊन संबंधित कुटुंबाची पाहणी करणार आहेत. एका मंडलातील अधिकारी दुसर्‍या मंडल विभागात पाठवला जाणार असून तालुक्यातील सर्व 14 मंडल विभागात ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
– प्रकाश अष्टेकर, कराड तालुका उपपुरवठा अधिकारी कराड

 

Back to top button