नाशिक : दोनशे बेडच्या रूग्णालयासाठी सिडको, पंचवटीत जागेचा शोध | पुढारी

नाशिक : दोनशे बेडच्या रूग्णालयासाठी सिडको, पंचवटीत जागेचा शोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या सहा विभागांपैकी सिडको आणि पंचवटी विभागात प्रत्येकी २०० बेडचे रुग्णालय सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले होते. या आदेशानंतर मनपा प्रशासनाने लगेचच रुग्णालयांसाठी लागणाऱ्या जागेचा शोध हाती घेतला आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नगररचना तसेच बांधकाम विभागाला तसे निर्देश दिले असून, जागा उपलब्ध झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार आहे.

नाशिक महापालिकेचे चार रुग्णालय, चार प्रसुतीगृह आणि २५ शहरी आरोग्य केंद्र आहेत. चार रुग्णालयांपैकी नाशिकरोडला बिटको आणि जुने नाशिकमधील कथडा भागात डॉ. झाकीर हुसेन रूग्णालय असे दोन रूग्णालये आहेत. यापैकी बिटको रुग्णालयाची २०० बेडची तर झाकीर हुसेन रुग्णालयाची १५० बेडची क्षमता आहे. पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयाची ५० आणि सिडकोतील मोरवाडी येथील स्वामी समर्थ रुग्णालयात ५० बेडची क्षमता आहे. नाशिक शहरात सर्वाधिक लोकसंख्येची घनता ही पंचवटी आणि सिडको विभागात आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २०० बेडचे नवीन रुग्णालय साकारण्याची सूचना पालकमंत्री भुसे यांनी महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत केली होती. भुसे यांच्या निर्देशानुसार आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार यांनी संबंधीत दोन्ही ठिकाणी रुग्णालय सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू केली असून, नगररचना आणि बांधकाम विभागाला तशा सूचना केल्या आहेत. रुग्णालयांसाठी महापालिकेच्या शहर विकास आराखड्यात पंचवटी आणि सिडको या दोन्ही भागात जागांचे आरक्षण आधीपासूनच आहे.

हेही वाचा:

Back to top button