उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पाण्यासाठी ओंकारनगरचे रहिवासी पालिकेच्या दारी

गणेश सोनवणे

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी रोडवरील ओंकारनगर, चाणक्यपुरी सोसायटी, कणसारा माता चौक परिसर, आदर्शनगर या परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी (दि.5) थेट मनपा मुख्यालय गाठत अधिकार्‍यांकडे गार्‍हाणे मांडले.

ओंकारनगर परिसरामध्ये एकवेळच पाणीपुरवठा केला जात असून, तोदेखील अत्यंत कमी दाबाने होत आहे. पहाटे 3:30 ते 6 दरम्यान कधीही पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.5) परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांच्यासह आयुक्त तसेच अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग यांची भेट घेत निवेदन दिले. या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करून जादा दाबाने सकाळी 6 नंतर करण्याची मागणी केली. यावेळी परिसरातील मनीषा लोखंडे, विद्या काटकर, शकुंतला आवारे, सुनीता गोसावी, सरिता सूर्यवंशी, सुनंदा कुटे, नीता पवार, गीता ठोंबरे, करिश्मा निकम, कल्याणी गडाख, यशवंत कचेरिया, अशोक शिंदे, तुषार गोसावी, राजेंद्र वैद्य, संजय धात्रक आदी उपस्थित होते.

पाणीटंचाईमुळे ओंकारनगर परिसरातील माता भगिनींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच सध्या पाणी अत्यंत कमी दाबाने येत असल्याने मनपा प्रशासनाने हा प्रश्न युद्धपातळीवर सोडविण्याची गरज आहे.
– प्रवीण जाधव,
सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT