उंब्रज : ग्रामसभेत दारू दुकानाच्या ठरावावरून राडा | पुढारी

उंब्रज : ग्रामसभेत दारू दुकानाच्या ठरावावरून राडा

उंब्रज; पुढारी वृत्तसेवा :
बिअर बारला परवानगी दिल्याच्या कारणावरून धावरवाडी (ता.कराड) येथील ग्रामसभेमध्ये तुंबळ हाणामारी झाली. तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान करून शिवीगाळ दमदाटी केली. मंगळवार दि.5 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून दोघांना अटक करण्यात आली.

याबाबत सचिन बाळू शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीसह नानासो गोरखनाथ शेळके, संजय सुदाम चंदूगडे, महेश प्रल्हाद चंदूगडे, विलास तातोबा शेळके, कृष्णात आनंदा चंदुगडे, राहुल बाळासो कदम, निलेश गोरखनाथ शेळके, संभाजी बाबुराव शेळके यांनी गावचे सरपंच महेश सुतार यांना ऐनवेळेच्या विषयांमध्ये तुम्ही मागील ठरवामध्ये गावामध्ये बिअर बारला परमिशन का दिली? असे विचारले असता सरपंच महेश सुतार तसेच श्रीकांत महादेव चव्हाण, प्रज्वल श्रीकांत चव्हाण, शंकर कोंडीबा चंदूगडे, सागर श्रीकांत चव्हाण, दादासो शंकर चंदूगडे हे अंगावर धाऊन आले व शिवीगाळ करून यातील सागर चव्हाण याने लाकडी बॅटने मारहाण करून जखमी केले. यावरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर सरपंच महेश संभाजी सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ग्रामसभा चालू असताना संजय सुदाम चंदुगडे, सचिन बाळू शेळके, महेश प्रल्हाद चंदूगडे, विलास तातोबा शेळके, कृष्णात आनंदराव चंदुगडे, निलेश गोरखनाथ शेळके, राहुल बाळासो कदम, नानासो गोरखनाथ शेळके यांनी मागील ग्रामसभेत तुम्ही निखिल साळुंखे रा.चोरे यांना बियर बारची परमिशन कशी काय दिली? असे म्हणून फिर्यादी यांच्या अंगावर धाऊन शिवीगाळ केली. संशयित संजय चंदुगडे याने मारहाण केली. तसेच श्रीकांत महादेव चव्हाण व त्यांची दोन मुले प्रज्वल चव्हाण व सागर चव्हाण यांना सचिन शेळके याने मारहाण केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच ग्रामसेवक विजय यशवंतराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ग्रामसभा सुरू असताना सचिन बाळू शेळके याने ऐनवेळेच्या विषयांमध्ये सरपंच महेश सुतार यांना तुम्ही मागील ग्रामसभेच्या ठरवामध्ये गावात बिअर बारला परवानगी कशी काय दिली? असे विचारले असता सरपंच महेश सुतार व सचिन बाळू शेळके व ग्रामस्थ यांच्यात बाचाबाची होऊन त्यानंतर मारामारी झाली. गावातील महेश प्रल्हाद चंदूगडे, निलेश गोरखनाथ शेळके यांनी विनापरवाना मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग चालू केले. त्यावेळी फिर्यादी यांनी नियमानुसार ग्रामसभा चालू आहे. तुम्ही शूटिंग करू नका? असे सांगितले. त्यावेळी दोघांनी ग्रामसेवक विजय शिंदे व सरपंच महेश सुतार यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ग्रामपंचायतीचे इंटरनेट सेवेचे साहित्याची मोडतोड केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची नोंद उंब्रज पोलिस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सपोनि. अजय गोरड करीत आहेत.

Back to top button