सांगली : जयंतरावांनी शेखर इनामदारांची काळजी करू नये | पुढारी

सांगली : जयंतरावांनी शेखर इनामदारांची काळजी करू नये

सांगली : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपचे नेते शेखर इनामदार यांची काळजी करू नये. भाजपचा नेता, कार्यकर्ता घरात बसणारा नाही, असा टोला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी लगावला आहे. शिंदे म्हणाले, शेखर इनामदार काय किंवा भाजपचा कोणताही कार्यकर्ता घाबरून घरात बसणारा नाही. रस्त्यावर येऊन काम करणारा आहे. शेखर इनामदार यांनी सांगली महापालिका निवडणुकीत त्याचबरोबर राज्यांमध्ये झालेल्या विविध पोटनिवडणुकांमध्ये आपले संघटन कौशल्य दाखवलेले आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी इनामदार यांची काळजी करू नये. 300 पेक्षा जास्त खासदार असणार्‍या भारतीय जनता पक्षाची 4 खासदार असणार्‍या पक्षाने चिंता करू नये. भाजपची सांगली जिल्ह्यात ताकद वाढत आहे आणि वाढत राहील. जागतिक प्रश्नांमुळेच पेट्रोल, डिझेलचे दर सर्वत्र वाढलेले आहेत. भाजपशासित राज्यांनी आपापले राज्यातील कर कमी करून त्या-त्या राज्यातील जनतेला पेट्रोल-डिझेलचा दर कमी करून थोडा दिलासा दिला आहे. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातील सरकारने दारूवरचा कर कमी केला. परंतु इंधनावर असणारा कर कमी केला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल हे नागरिकांना जास्त दराने घ्यावे लागत आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

महापालिकेत ‘करेक्ट कार्यक्रम’च्या नावाखाली विरोधी नगरसेवकांना वेगवेगळी आमिष दाखवून त्यांना फोडायचे आणि महापालिकेतला चांगला चाललेला कारभार उद्ध्वस्त करायचा, असा त्यांचा डाव आहे. आपली ‘सोनेरी टोळी’ पुन्हा सत्तेवर बसवायची. महापालिकेच्या माध्यमातून भाजपाच्या नगरसेवकांच्या माध्यमातून केलेल्या कामे आम्हीच केली, असे भासवण्याचा केविलवाणा प्रकार पालकमंत्री म्हणून जयंत पाटील सध्या करत आहेत, अशी टीकाही दीपक शिंदे यांनी केली.

Back to top button