उत्तर महाराष्ट्र

नाशिक : सहा महिन्यांनंतरही गटारीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने स्थानिकांचे धरणे

अंजली राऊत

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव हायस्कूल ते पवारवाडीकडे जाणार्‍या मशरिकी एकबाल रोडवरील गटार दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी स्थानिकांसह व्यावसायिकांनी मौलाना उस्मान चौकात धरणे आंदोलन केले.

या भागात 770 मीटरची गटार आहे. तिच्या दुरुस्तीसाठी एक कोटीचा निधी मंजूर होऊन सहा महिन्यांपूर्वी कामाला प्रारंभ झाला. परंतु, ते 317 मीटरच्या पुढे सरकलेले नाही. मालेगाव हायस्कूलजवळून जाणार्‍या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता हसनपुरा चौक, पवारवाडी व पुढे मुंबई-आग्रा महामार्गापर्यंत जोडला जातो. पाच वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात त्यात पाणी तुंबते. त्यात वाहनधारक धडकतात. तर इतर हंगामात धुळीचे साम्राज्य असते. या परिसरात नळांना पाणी आल्यानंतर गटारी तुडुंब भरून वाहतात. शुक्रवारची नमाज पठण करण्यासाठी या गटारीच्या पाण्यातून वाट काढत मशिदीत जावे लागते. तसेच पुढे पवारवाडी रस्त्यावर कच्च्या गटाराचे नेहमीच पाणी वाहते. या गैरव्यवस्थेला कारणीभूत ठरणार्‍या रस्ता व गटारीचे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी महापालिका प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. परंतु, त्याची दखल घेतली जात नसल्याने आंदोलकांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महापालिका प्रशासनातर्फे 15 दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पवारवाडीचे पोलिस निरीक्षक एस. बी. पाटील यांनी बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते मोहंमद लुकमान अनिस अहमद, मजीद अन्सारी, इबाहीम शेख, दस्तगीर शेख, सलीम अब्दुल रऊफ, सलमान जिया, सुलतान अन्सारी, अथर खान, खलील अन्सारी, रिहान अन्सारी आदींसह नागरिक उपस्थित होते.

कार्यादेश नावालाच
मालेगाव महानगरपालिकेतर्फे होणारी कोणतीच कामे वेळेत सुरू अथवा पूर्ण होत नसल्याचा पायंडा पडला आहे. प्रशासन ठेकेदारांना कार्यादेश देताना काम किती अवधीत पूर्ण करावे, याचे बंधन घालत असले तरी, हा प्रपंच केवळ औपचारिकता ठरतो. ठेकेदारांना मनमर्जी काम करण्याची मुभा दिली जाते, असा आरोप यावेळी करण्यात आला.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT