बारामतीत गाठी-भेटी घेण्यावर भर; विकासाच्या मुद्द्याऐवजी गावकी-भावकीवर जोर | पुढारी

बारामतीत गाठी-भेटी घेण्यावर भर; विकासाच्या मुद्द्याऐवजी गावकी-भावकीवर जोर

सोमेश्वरनगर (ता. बारामती); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून, मतदारराजांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर भर दिला जात आहे. शनिवारी (दि. 17) सायंकाळी प्रचार थांबणार आहे. त्यामुळे प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीत मागील पाच वर्षांत केलेल्या कामाबद्दल राष्ट्रवादीच्याच दोन्हीही गटांकडून फारसे बोलले जात नाही.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील गावांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. मात्र, अनेक ठिकाणी निकृष्ट कामे झाली, याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही. वास्तविक विकासकामांच्या मुद्यावर निवडणूक होणे अपेक्षित असताना याबाबत प्रमुख पदाधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत.

विकासकांसाठी निधी येऊनही काही ठिकाणी ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांच्या राजकारणामुळे निधी शिल्लक आहे. तो खर्च झाला नसल्याने अनेक कामे अर्धवट तर काही ठिकाणी नियोजित कामे पूर्णही झाली नाहीत. पिण्याचे पाणी, अर्धवट सोडलेल्या गटार लाईन, कित्येक वर्षांपासून अपूर्ण राहिलेली घरकुल योजना, रस्त्यांची झालेली निकृष्ट कामे, ठेकेदारांची मर्जी राखण्यासाठी केलेला खटाटोप, ग्रामपंचायतीच्या निधीतून घेतलेले वैयक्तिक लाभ, गावात असलेली अस्वच्छता, कोरोना काळात ग्रामस्थांच्या अडचणी न सोडविणे आदी कामे न झाल्याने काही गावांत ग्रामपंचायतीवर मतदारराजा नाराज आहे.

मतदार पडले बुचकळ्यात
निवडणुकीत मागील पाच वर्षांत केलेल्या कामांचा कोणताही उल्लेख दोन्हीही गटांकडून केला जात नसल्याने पाच वर्षांत गावात नेमकी कोणती कामे झाली, किती निधी आला, कोणती कामे सुरू आहेत, कोणती बंद आहेत, येणार्‍या योजना, राबविलेल्या योजना याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. परिणामी, मतदार बुचकळ्यात पडले आहेत.

रस्त्यांचे प्रश्न संपण्याची आशा
गावकी, भावकी, मित्र परिवार आणि पाहुणे-राऊळे या निवडणुकीत एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. कित्येक वर्षांपासूनचे रस्त्यांचे प्रश्न या निवडणुकीत संपतील, अशी आशा ग्रामस्थांना आहे. प्रत्येकजण एकमेकांना मदत करायला सांगत आहेत. ही निवडणूक अनेकांचे राजकीय भवितव्य उजळवणारी तर अनेकांचे गावावरील वर्चस्व दूर करणारी ठरणार असल्याने दोन्हीही गटांकडून सध्या जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत.

अनेकांना सुगीचे दिवस
निवडणुकीत वाहनांद्वारे प्रचार यंत्रणा जोरदार काम करत असल्याने वाहन चालक, गमजे, टोप्या, झेंडे, निवडणूक चिन्हे व त्यासाठी लागणारे साहित्य, जेवणावळींमुळे हॉटेल व्यावसायिक, बॅनर, मंडपवाले आदींना चांगले दिवस आले आहेत.

 

 

Back to top button