कौतुकास्पद! चिमुकल्या रुद्राणीकडून 21 गडकिल्ल्यांवर चढाई | पुढारी

कौतुकास्पद! चिमुकल्या रुद्राणीकडून 21 गडकिल्ल्यांवर चढाई

ओतूर (ता. जुन्नर); पुढारी वृत्तसेवा : सर्वांत कमी वयात सह्याद्रीच्या डोंगररांगांतील अत्यंत अवघड असे 21 किल्ले, गड सर करणारी रुद्राणी जुन्नर तालुक्याचे भूषण ठरली आहे. तिच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अलंग, मदन व कुलंग हे अत्यंत अवघड किल्ले सर करणारी ती महाराष्ट्रातील पहिली छकुली आहे. अत्यंत अवघड लिंगाणा व मोरोशीचा भैरवगड हे वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिने सर केले आहेत. तसेच आत्तापर्यंत एकूण 21 किल्ले लीलया सर केलेले आहेत.

लिंगाणा, भैरवगड 3 वेळा, जीवधन 5 वेळा, हडसर, चावंड, निमगिरी, हनुमंतगड, लोहगड, विसापूर, शिवनेरी, गोरखगड, अलंग, मदन, कुलंग आदी अवघड चढणीचे किल्लेही सर केलेले आहेत. रुद्राणी गणेश दिघे (वय 6, रा. धोलवड, ता. जुन्नर) असे या छकुलीचे नाव असून, ती इयत्ता 1 लीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. वडील गणेश दिघे हे तिला प्रोत्साहन देत असून, जागतिक पर्वत दिनाचे औचित्य साधून तिने अकोले तालुक्यातील कळसूबाई पर्वतरांगेतील अत्यंत अवघड असे त्रिकूट किल्ले अलंग, मदन व कुलंग हे नुकतेच सर केले आहेत.

शुक्रवारी (दि. 9) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ती घरातून बाहेर पडली ती थेट रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पायथ्याचे गाव आंबेवाडी येथे पोहचली. शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पायथ्याचे गाव आंबेवाडी येथून चढाईस सुरुवात झाली. सोबत सह्यगिरी अ‍ॅडवेंचर्सचे दीपक विशे, मोनिका विशे असा 15 जणांचा ग्रुप होता.

तब्बल 3 तासांच्या अथक परिश्रमानंतर व जंगल ट्रेकनंतर साधारण 9 वाजण्याच्या सुमारास अलंग किल्ल्याचा मुख्य कडा जिथून खरा अवघड टप्पा सुरू होतो तिथे ही सर्व टीम पोहचली. हेल्मेट, हरनेस परिधान करून चढाईस सुरुवात केली. 40 फुटांचा कडा चढून नंतर अर्धा तास पुढे चालून किल्ल्याच्या माथ्यावर साधारण ते 1 वा. पोहचले.

मदन किल्ला हा आकाराने लहान व तुटलेल्या पायर्‍यांमुळे खूपच अवघड आणि भयावह दिसत होता. किल्ल्याचा संध्याकाळी 7 वाजता माथा गाठला व तेथेच गुहेत रात्रीच्या मुक्कामासाठी तंबू लावला व जेवण बनवले. दुसर्‍या दिवशी (दि. 11) सकाळी गड उतरून कुलंग किल्ला चढाईसाठी सुरुवात केली. घनदाट जंगल व निसरडी पायवाट चालत तब्बल 3 तास चढाई करून किल्ल्याच्या माथ्यावर सर्वजण पोहचले.

Back to top button