जिल्हा परिषद नाशिक 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : जिल्ह्यातील गट, गण रचनेचे प्रारूप आराखडे जाहीर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि.2) जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे गट व गण रचनेचे प्रारूप आराखडे जाहीर केले. यामुळे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे पडघम सुरू झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत 11 गट वाढून ती संख्या 84 व गणांची संख्या 168 झाली आहे. या प्रारूप आराखड्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेकडे हरकती नोंदवता येणार असून, 10 जूनला विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी 3 ला सुनावणी होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने 25 मे रोजी गट व गणांचे प्रारूप आराखडे तयार करून ते विभागीय आयुक्तांकडे तपासणीसाठी पाठवले. विभागीय आयुक्तांनी त्याची तपासणी करून 31 मे रोजी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले. या गट व गण रचनेचे प्रारूप आराखडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गुरुवारी (दि. 2) सायं. 4 ला प्रसिद्ध करण्यात आले. या प्रारूप आराखड्यांसाठी नाशिक जिल्ह्याची 2011 च्या जनगणनेची लोकसंख्या 24 लाख 78 हजार 168 आधारभूत मानल्यामुळे 28 ते 30 हजार लोकसंख्येचा एक गट करण्यात आला आहे.

मालेगावला 2 गट वाढले
नाशिक जिल्ह्यातील गटांची संख्या 84 झाल्यामुळे आता 10 तालुक्यांमधील गटांची संख्या 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत वाढली आहे. त्यातील नाशिक, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, बागलाण, कळवण, सुरगाणा या तालुक्यांमधील प्रत्येकी एक गट वाढला आहे. निफाड तालुक्यातील ओझर गट रद्द झाल्याने तेथील गटांची संख्या नऊ झाली होती. मात्र, या नवीन प्रारूप आराखड्यानुसार निफाड तालुक्यात एक गट वाढून संख्या पुन्हा 10 झाली आहे. मालेगावातील गटांची संख्या सातवरून नऊ झाली. निफाड, येवला, नांदगाव, इगतपुरी, देवळा येथील गटांच्या प्रारूप रचनेत बदल झालेला नाही.

हरकतींवर 10 ला सुनावणी
गट व गणांचे प्रारूप आराखडे नागरिकांना बघण्यासाठी जाहीर केल्यानंतर या प्रारूप आराखड्यांवर उद्या (दि.3)पासून हरकती नोंदवता येणार आहे. या हरकती जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेत स्वीकारल्या जाणार असून, या हरकतींवर 10 जूनला दुपारी तीनला विभागीय आयुक्त कार्यालय येथे सुनावणी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या हरकतींची माहिती त्याच दिवशी संबंधित तहसीलदार कार्यालयाकडे पाठवल्या जाणार असून त्यांनी त्या हरकतींवर समर्पक खुलासा व अभिप्राय त्याच दिवशी विभागीय आयुक्त कायार्लयास सादर करण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT