उत्तर महाराष्ट्र

Nashik : शिंदे गटात गेलेल्या गद्दारांना भुईसपाट करू – विजय करंजकर यांचा इशारा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नऊ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना गद्दार आणि दलाल संबोधून संबंधितांना आगामी निवडणुकीमध्ये भुईसपाट केल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही, असा इशारा दिला.

शालिमार चौकातील मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, मनपाचे माजी गटनेते विलास शिंदे, मध्य विधानसभा संघटक बाळासाहेब कोकणे, राहुल दराडे, देवानंद बिरारी, भागवत आरोटे आदी उपस्थित होते.

करंजकर पुढे म्हणाले, शिंदे गटात गेलेल्या अजय बोरस्ते यांना बारा वर्षांत शिवसेनेने महानगरप्रमुख, उपमहापौर, गटनेता, विरोधी पक्षनेता अशी सर्व महत्त्वाची पदे दिली. अनेक कट्टर व निष्ठावान शिवसैनिक असताना पक्षाने त्यांना मोठे केले. असे असताना त्यांनी गद्दारी करणे ही लाजिरवाणे आहे. पक्षातून नऊ माजी नगरसेवक गेले असून, त्यातील तीन नगरसेवक हे शिवसेनेचे निष्ठावान असून, त्यांना परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. बाकी इतर सहा नगरसेवक हे आयाराम-गयाराम असेच होते. संजय राऊत यांच्याबद्दल अपशब्द काढणे हे बोरस्तेंना शोभत नाही. त्यांची प्रतिक्रिया घृणास्पद आहे. शिवसेनेत कट्टर शिवसैनिकांची अजिबात कमतरता नाही. त्यामुळे असे कितीही गेले तरी शिवसेना तेवढीच ताकदीने पुन्हा उभी राहील, असा दावाही करंजकर यांनी केला.

पक्ष सोडलेल्यांचे काय हाल होतात याला इतिहासाची साक्ष असून, यावेळी करंजकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची उदाहरणे दिली. खासदार संजय राऊत यांनी सर्वच माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी तसेच नाराजी जाणून घेतली. त्यांच्याबरोबर जेवणही केले. असे असताना काही पळून जाणार असेल तर त्याला कोण काय करणार? अशी प्रतिक्रिया करंजकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.

बोरस्तेंनी विश्वासघात केला

बोरस्ते यांनी शिवसेनेतून बाहेर पडून स्वत:चा आत्मघात केला असून, पक्षाचा विश्वासघात केला आहे. आणखी काही माजी नगरसेवक पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत का? असा प्रश्न विचारला असता अशा लोकांशी संवाद साधून त्यांना रोखण्यासाठी पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून देणार असल्याचे करंजकर यांनी सांगितले.

प्रवेशामागे अर्थकारणाची चर्चा

शिंदे गटात प्रवेश करण्यामागे मोठे राजकारण असल्याची शक्यता करंजकर यांनी व्यक्त करत अशा दलालांना त्यांची जागा दाखवली जाईल. पक्षाच्या जिवावर स्वत:च्या तुंबड्या भरणारे कधीही पुन्हा निवडून येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT