

वालचंदनगर (ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : भरणेवाडी (ता. इंदापूर) येथील शेतकरी कुटुंबातील सौरभ संतोष धातुंडे (वय 23) याची भारतीय सैन्य दलाच्या लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. त्याच्या यशाने भरणेवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सौरभ याचे प्राथमिक शिक्षण भरणेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले.
तदनंतर त्याने सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन पहिल्याच प्रयत्नात तो ओटीए (ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकेडमी) बिहार येथील गया येथे त्याला प्रवेश मिळाला. नंतर त्याने हैद्राबाद येथे बी.टेक. पूर्ण केले. आता त्याने भारतीय सैन्य दलाच्या लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे.
अत्यंत सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या सौरभ याने लहानपणापासून जिद्दीने शिक्षण घेतले. सौरभ याला लहानपणापासूनच पित्याचे छत्र मिळाले नाही, असे असतानाही त्याने अत्यंत मेहनतीने आपले ध्येय गाठताना मागे फिरून पाहिले नाही. सौरभ याची आई सारिका, आजी शकुंतला व आजोबा परशुराम यांनी शेतीमध्ये काबाडकष्ट करून मुलाच्या शिक्षणासाठी येणारा खर्च भागवला. अखेर मुलाच्या यशाने त्याच्या आई व आजी आजोबांच्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान कुटुंबियांच्या चेहर्यावर स्पष्ट जाणवत आहे.
सौरभ यांच्या नियुक्तीनंतर शुक्रवारी (दि. 16) माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्याचा यथोचित सन्मान केला. या वेळी बोलताना भरणे म्हणाले, जीवनामध्ये खडतर प्रवास असतानाही किंचितही न डगमगता सौरभ याने यश मिळवले आहे. युवकांनी सौरभ याचा आदर्श घेऊन वाटचाल करण्याची गरज असल्याचे मत यावेळी माजी राज्यमंत्री भरणे यांनी व्यक्त केले.