पौडमध्ये डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ; खासगी आणि शासकीय रुग्णालयांत गर्दी | पुढारी

पौडमध्ये डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ; खासगी आणि शासकीय रुग्णालयांत गर्दी

पौड (ता. मुळशी); पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील आठवडाभरात काही रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याने काही रुग्ण सरकारी, तर काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने नक्की रुग्ण संख्या किती याचा अंदाज येत नाही.

एक महिन्यापूर्वी डेंग्यूचे रुग्ण पौड गावात आढळले होते. या रुग्णांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली होती. मात्र, डासांची पैदास होऊ नये म्हणून गावात औषध फवारणी या वेळी करण्यात आली नाही; परंतु पुन्हा एक ते दोन महिन्यांच्या कालावधीनंतर डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या आढळलेले रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, जास्त लक्षणे नसल्याने काहीजण घरीच उपचार घेत आहेत. सध्या पौड गावात सायंकाळी चारनंतर धूरफवारणी यंत्राच्या साहाय्याने फवारणी सुरू असून, लवकर सर्व गावात फवारणी करण्यात येणार आहे. तसेच डेंग्यूबाबत जनजागृतीदेखील करणार असल्याचे सरपंच अजय कडू, ग्रामविकास अधिकारी विजय कदम, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार यांनी सांगितले.

Back to top button