नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरासह ग्रामीण भागातील दुकाने फोडून किमती ऐवज व रोकड चोरणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. हसन हमजा कुट्टी (४४, रा. नवनाथनगर, पेठरोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने ११ घरफोड्यांची कबुली दिल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुन्हे शाखेचे पोलिस नाईक विशाल काठे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून नवनाथनगर परिसरातून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने शहरात पाच व ग्रामीणच्या हद्दीत पाच दुकाने फोडल्याची कबुली दिली. त्यात पंचवटीत दोन, म्हसरूळ, मुंबई नाका, आडगाव, भद्रकालीत प्रत्येकी एक, तर ग्रामीणमधील वाडिवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन व नाशिक तालुका, वणी येथील प्रत्येकी एक दुकान फोडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून घरफोडीतील मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. कुट्टीविराेधात १४ घरफोड्यांचे गुन्हे दाखल असून त्यापैकी एका गुन्ह्यात त्याने शिक्षा भोगली आहे. त्याचप्रमाणे त्याने सोलापूर जिल्ह्यासह मध्य प्रदेशमध्येही ७ ते ८ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्याचा जोडीदार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझिमखान पठाण, विशाल देवरे, मुक्तार खोख आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
हेही वाचा :