उत्तर महाराष्ट्र

नाशिक : मिर्ची चौकात गतिरोधक, रंबल स्ट्रीप उभारणी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

बस आणि ट्रक अपघातानंतर शहरातील हॉटेल मिर्ची चौकात अनेक सुधारणा केल्या जात असून, बांधकाम विभागाकडून गतिरोधक आणि खडखडाट पट्टी (रंबल स्ट्रीप) बसविण्यात आली आहे. तपोवन बाजूकडून मिर्ची चौक सिग्नल येथील डाव्या बाजूच्या रस्त्याच्या फॅनिंगचे काम सुरु करण्यात आले आहे. उर्वरीत तीन बाजूंच्या फॅनिंगची कामे करण्यासाठी फॅनिंगमधील अनधिकृत व अतिक्रमित बांधकामे व शेड काढण्याबाबत नगरनियोजन व अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नोटिसा बजावलेल्या काही लोकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. जे स्वतःहून अशी बांधकामे काढून घेणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. नाशिक मनपामार्फत तत्काळ उपाययोजनेंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. खड्डे बुजवण्यात आले आहेत. पॅच वर्क करण्यात आले आहे. या चौकात येणारी वाहनांचा वेग मर्यादित होण्याच्या दृष्टीने औरंगाबाद रोडला जाऊन मिळणारा मनपाच्या रस्त्यावर गतिरोधक, रंबलर उभारण्यात येऊन अपघात प्रवण क्षेत्र आणि गतीरोधकाचा फलक लावण्यात आला आहे.

शहर अभियंता शिवकुमार वंजारी आणि कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांनी सर्व कामांची पाहणी केली. लवकरच येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. रस्त्यावर दुभाजकही बांधला जाणार आहे. महावितरण अधिका-यांनी आज डीपी बसवण्याबाबत पाहणी केली. मनपाच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती. नांदूर नाक्यावरुन येणा-या महामार्गाच्या बाजूला सिग्नजवळचे विद्युत रोहित्र हटवण्याबाबत अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. तसेच अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत करण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.

इतर चौकांतही सुधारणा होणार

महत्वाची बाब म्हणजे मिर्ची चौकाच्या धर्तीवर नांदूर नाका आणि सिद्धिविनायक लॉन्स चौकातही सुधारणा केली जाणार आहे. शहरातील इतर ब्लॅक स्पॉटबाबतही लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली. दुसरीकडे नाशिकरोड विभागात बीएम मटेरीअलने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच वीर सावरकर उड्डाणपूलवरही खड्डे बुजवून पॅच वर्क करण्यात आले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT