नाशिक : दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
येथील गंगावेस भागात पाच ते सहा दिवसांपूर्वी दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारीत गंभीर जखमी शंकर मल्लू माळी (35) या तरुणाचा बुधवारी (दि. 12) रात्रीच्या सुमारास उपचारादमम्यान मृत्यू झाला. त्यानंतर गंगावेस भागात तणावपूर्ण वातावरण होते. मात्र, वैदूवाडी येथील म्हसोबा महाराज चौकात झालेल्या बैठकीत समाजबांधवांनी सामंजस्याची भूमिका घेत शांतता राखली. संशयितांना तत्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी केली. त्यावर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी 24 तासांच्या आत संशयितांना अटक करण्याचे आश्वासन दिले.

दसर्‍याच्या दिवशी नायगाव रोडवर मोटारसायकलला कट मारल्याच्या वादातून मळहद्द व वैदूवाडीतील युवकांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी पुन्हा या वादाची कुरापत निघाली व दोन्ही गटांत तुफान हाणामारी झाली. त्यात शंकर माळी या युवकावर धारदार शस्त्राने वार झाला. त्यात त्यात शंकर गंभीर जखमी झाला होता. हाणामारीत मळहद्द येथील काही युवकही जखमी झाले होते. जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, बुधवारी (दि. 12) रात्रीच्या वेळी वैदूवाडी येथील जखमी युवक शंकरचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गुरुवारी सकाळपासून वैदूवाडीसह गंगावेस, नाशिकवेस परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे या परिसरातील सर्वच व्यावसायिकांनी सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवली होती.

सखोल चौकशी, कठोर कारवाईची मागणी
पोलिस उपअधीक्षक तांबे यांच्यासह पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, लासलगावचे सहायक निरीक्षक राहुल वाघ यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. समाजबांधवांची बाजू ऐकून घेतली. यावेळी मृत शंकर यांचे बंधू रामा माळी यांनी सखोल चौकशी करून आरोपींना अटकेची मागणी केली. मागण्यांचे निवेदनही पोलिसांना दिले. मृत शंकर यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहरात खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त
पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून वैदूवाडी, गंगावेस, नाशिकवेस, आडवा फाटा, वावी वेस, छत्रपती शिवाजी चौक, बसस्थानक परिसरात जवळपास 125 पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, वैदूवाडी येथील समाजबांधवांनी एकत्र येत बैठक घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. सिन्नरसह एमआयडीसी, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, घोटी, वावी पोलिसांचा बंदोबस्तात समावेश आहे.

हेही वाचा :

Back to top button