उत्तर महाराष्ट्र

नाशिक शहर-जिल्ह्यात एकहाती सत्ता हेच लक्ष्य ; सुनील बागूल यांची प्रकट मुलाखत

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर शिवसेनेची एकहाती सत्ता आणणे आणि शिवसेनेतर्फे प्रभावी मते मांडण्यासाठी वक्ते आणि प्रवक्ते तयार करणे यावर आपला विशेष भर राहील, असे प्रतिपादन शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते सुनील बागूल यांनी केले.

उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल स्वराज्य महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे कंपनी कामगार ते उपनेतेपदापर्यंतचा प्रवास याबद्दल 'सफरनामा'अंतर्गत प. सा. नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आर. जे. अधीश गबाले आणि दिलीप फडोळ यांनी बागूल यांची प्रकट मुलाखत घेतली. राजकारणाचा कोणताच वारसा नसला तरी लहानपणापासूनच आपणास नेतृत्व आणि वक्तृत्वाची आवड होती. एका कंपनीत नोकरीस लागलो. तेथे युनियन अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आलो. त्यानंतर कामगार संघटनेशी जुळलेले अतूट नाते आजतागायत कायम असून, हे काम करताना शिवसेनेकडे मी आकृष्ट झाल्याचे बागूल यांनी सांगितले.

कर्तृत्वामुळेच विभागप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख, सहसंपर्कप्रमुख आणि आता उपनेतेपद भूषविण्याचा बहुमान मला मिळाला. अनेक आंदोलनात सहभाग घेतला. तुरुंगवासही भोगला. पक्षाच्या संघटनवाढीसाठी सातत्याने मी प्रयत्नशील राहिलो. सतत पक्षाचाच विचार करीत राहिल्याने कुटुंबाकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. परंतु, कुटुंबीयांनीही त्याबद्दल नाराजी व्यक्त केली नाही, असे सांगताना बागूल काहीसे भावुक झाले.

सुरुवातीला दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, जयंत दिंडे, जगन आगळे, डी. जी. सूर्यवंशी यांनी बागूल यांचा जीवनपट उलगडून दाखविला. व्यासपीठावर विलास शिंदे, महेश बडवे, सचिन मराठे, शशिकांत कोठुळे, योगेश चव्हाणके, संजय बागूल, कुणाल भोसले, मंगला भास्कर, श्यामला दीक्षित, सुवर्णा मटाले, मनीषा लासुरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT