उत्तर महाराष्ट्र

नाशिक : रावणदहनामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल

गणेश सोनवणे

नाशिक/पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
दसर्‍यानिमित्त बुधवारी (दि.5) चर्तुसंप्रदाय आखाडा महंत कृष्णचरणदास महाराज यांच्यातर्फे रावणदहन आयोजित करण्यात आले आहे. रावणदहनापूर्वी श्रीराम लक्ष्मण सेनेची मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे मिरवणूक व रावणदहनासाठी हजारो भाविकांची गर्दी होणार आहे. गर्दीमुळे वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केले आहेत.

दसर्‍यानिमित्त बुधवारी (दि.5) पंचवटीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. त्याचप्रमाणे चर्तुसंप्रदाय आखाडा महंत कृष्णचरणदास महाराज यांच्यातर्फे रावणदहन, श्रीराम लक्ष्मण सेनेची मिरवणूक, ओझर येथील नवरात्र मंडळाच्या देवीचे रामकुंड येथे विसर्जन होत असते. त्यामुळे हजारो भाविकांची गर्दी पंचवटी परिसरात असते. चर्तुसंप्रदाय आखाडा येथून सायंकाळी 6 वाजता श्रीराम लक्ष्मण सेनेची मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक मालेगाव स्टँड, मालवीय चौक, शिवाजी चौक, सीतागुंफा रोडमार्गे श्री काळाराम मंदिर सरदार चौक, साईबाबा मंदिर ते रामकुंड पार्किंग मैदानापर्यंत निघणार असून, तेथे रामलीला कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री 8 पर्यंत रावणदहनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमांना भाविकांची गर्दी होत असल्याने मालेगाव स्टँड ते गाडगे महाराज पूल या अरुंद मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे भाविकांसह इतर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी वाहतूक मार्गात बदल केले असून, त्यानुसार बुधवारी दुपारी 3 ते रात्री 12 पर्यंत मालेगाव स्टँड- रामकुंड-सरदार चौक ते संत गाडगे महाराज पुलापर्यंत एकेरी वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर संत गाडगे महाराज पुलाकडून मालेगाव स्टँडकडे येणार्‍या वाहतुकीस प्रवेश बंद असेल. त्यांना पर्यायी मार्ग म्हणून गणेशवाडी, काट्या मारुती पोलिस चौकी, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजामार्गे इतरत्र जाऊ शकतील.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT