भगवान देता है तो छप्पर फाड के... किराणा आणायला गेला आणि बनला करोडपती! | पुढारी

भगवान देता है तो छप्पर फाड के... किराणा आणायला गेला आणि बनला करोडपती!

न्यूयॉर्क : ‘भगवान देता है तो छप्पर फाड के’ असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. अमेरिकेतील एका माणसाला नुकताच त्याचा अनुभव आला. पत्नीच्या सांगण्यावरून (कोणत्याही नवरोबाप्रमाणे निमूटपणे) तो दुकानात किराणा आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याने खरेदी केलेल्या लॉटरी तिकिटाला चक्क जॅकपॉट लागला आणि तो कोट्यधीश बनला.

या माणसाचे नाव प्रेस्टन माकी. त्याने तब्बल दीड कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. ऑफिसमधून घरी येत असतानाच त्याला त्याच्या पत्नीने मेसेज करून किराणा दुकानातून सामान घेऊन येण्यास सांगितले होते. त्यावेळी त्याने हे लॉटरी तिकीट खरेदी केले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी माकीने लॉटरीच्या मोबाईल अ‍ॅपने तिकीट स्कॅन केले आणि पाहिले की तो जॅकपॉट विजेता ठरला आहे. त्याच्यासाठी हा खरोखरच एक सुखद धक्का होता. या बक्षिसातील काही रक्कम गुंतवण्याचा आणि काही भाग कुटुंबाला देण्याचा त्याचा मानस आहे. त्याने या लॉटरीमधून 1,90,736 डॉलर्स म्हणजेच सुमारे दीड कोटी रुपये जिंकले आहेत.

एका मुलाखतीत त्याने सांगितले की मी माझ्या पत्नीला सामान खरेदी करण्यास सुरुवातीला नकार दिला होता. मात्र, तिने विनंती (!) केल्यानंतर कामावरून परतत असताना मी जवळच्या किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेलो. त्यादिवशी माझ्या बायकोने जबरदस्ती केली नसती तर कदाचित मी सामान आणण्यासाठी गेलो नसतो. त्यामुळे ही लॉटरी जिंकण्यात माझ्या पत्नीचा मोठा हात आहे!

Back to top button