नाशिक : गौरव अहिरे
शहरात 1 जानेवारी ते 11 एप्रिल 2022 या 100 दिवसांच्या कालावधीत चोरट्यांनी चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा टाकून तब्बल तीन कोटी चार लाख 84 हजार 244 रुपयांवर डल्ला मारला आहे. 100 दिवसांच्या कालावधीत शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये चोरी, घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरी प्रकरणी शहरात 397 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सर्वाधिक 219 गुन्हे वाहनचोरीचे आहेत. यात चोरट्यांनी 81 लाख 99 हजार 402 रुपयांचे वाहने लंपास केली आहेत. तर 52 घरफोडींच्या गुन्ह्यात सर्वाधिक एक कोटी 20 लाख 24 हजार 695 रुपयांच्या मालमत्तेवर चोरट्यांनी डल्ला मारला.
शहराच्या सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणा 24 तास सतर्क असते. त्या जोडीला सीसीटीव्हीही असतात. मात्र, तरीदेखील चोरटे चोरी करून नागरिकांचा किमती ऐवज लंपास करीत असतात. शहरात 100 दिवसांत दुचाकी चोरी प्रकरणी 201, चारचाकी वाहनचोरी प्रकरणी 11 व तीनचाकी वाहनचोरी प्रकरणी 7 गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे इतर चोरी प्रकरणी 86, घरफोडी प्रकरणी 52, जबरी चोरी, दरोडा प्रकरणी 39 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी 15 ते 20 वयोगटांतील 12 फिर्यादी आहेत. त्याचप्रमाणे 21 ते 30 वयोगटांतील 92, 31 ते 40 वयोगटांतील सर्वाधिक 102, 41 ते 50 वयोगटांतील 85, 51 ते 60 वयोगटांतील 66 व 61 पुढील वयोगटांतील 40 तक्रारदारांनी पोलिसांकडे फिर्याद दिल्या आहेत. यातील काही गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी चोरट्यांकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र, अनेक गुन्ह्यांची उकल अद्याप झालेली नाही. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.
फसवणुकीतही
सव्वाचार कोटींचा गंडा…
भामट्यांनी शहरातील आबालवृद्धांना ऑनलाइन, मदतीच्या बहाण्याने, जागा खरेदी-विक्री, नोकरी देण्याच्या बहाण्याने गंडा घातल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यात भामट्यांनी 48 गुन्ह्यांत नागरिकांना गंडा घालून चार कोटी 25 लाख 13 हजार 389 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
गुन्ह्याचा प्रकार : फिर्यादी पुरुष फिर्यादी महिला रक्कम
दुचाकी चोरी 186 15 50,17,400
चारचाकी चोरी 10 01 28,80,002
तीनचाकी चोरी 07 00 3,02,000
घरफोडी 45 07 1,20,24,695
चोरी 69 17 80,78,691
जबरी चोरी (दागिने) 03 19 18,62,356
जबरी चोरी (इतर) 13 05 03,19,100