अखेर चेन्नई विजयी, शिवम दुबे, रॉबिन उथप्पाची धमाकेदार फलंदाजी

अखेर चेन्नई विजयी, शिवम दुबे, रॉबिन उथप्पाची धमाकेदार फलंदाजी
Published on
Updated on

मुंबई : चेन्नईने ठेवलेले 217 धावांचे लक्ष्य रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पेलवले नाही आणि त्यांना 23 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईने साकारलेला हा पहिला विजय होय. त्यांच्या खात्यात पाच सामन्यांतून एक विजय आणि चार पराभवांसह दोन गुण जमा झाले आहेत. आरसीबीने पाच सामन्यांतून दोन पराभव व तीन विजयांसह सहा गुणांची कमाई केली आहे. शिवम दुबे आणि रॉबिन उथप्पाची धमाकेदार फलंदाजी व फिरकीपटू माहिश थीक्साना याचे 4 बळी हे चेन्नईच्या विजयाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. आरसीबीने 9 बाद 193 धावा केल्या.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जला फलंदाजीकरिता आमंत्रित केले. त्यानंतर शिवम दुबे आणि रॉबिन उथप्पा यांनी केलेल्या गगनभेदी फलंदाजीच्या बळावर चेन्नईने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 216 धावांचा पर्वत उभारला. गेल्या आयपीएलचा हिरो ठरलेला ऋतुराज गायकवाड हा चेन्नईचा सलामीवीर यंदा सातत्याने अपयशी होत असून, त्याने या लढतीत अवघ्या 17 धावा केल्या त्या तीन चौकारांसह. जोश हेझलवूडने त्याला पायचीत पकडले. मोईन अली दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. त्याला फक्त 3 धावा करता आल्या. मात्र, दुसरा सलामीवीर रॉबिन उथप्पा याला चांगलाच सूर सापडला होता. शिवम दुबेने त्याला सुरेख साथ दिली. दोघांनीही अर्धशतके ठोकली आणि मुख्य म्हणजे प्रतिषटक दहा धावांची गती राखली.

आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. फलकावर 14 धावा लागलेल्या असतानाच कर्णधार फाफ डू प्लेसिस 8 धावा करून तंबूत परतला. पाठोपाठ केवळ धाव करून विराट कोहली बाद झाला. त्यावेळी फलकावर 20 धावा लागल्या होत्या. दुसरा सलामीवीर अनुज रावत हाही करामत करू शकला नाही. त्याने 12 धावा केल्या. खेळात रंग भरला तो ग्लेन मॅक्सवेलने. त्याने 11 चेंडूंत धडाकेबाज 26 धावा केल्या. कर्णधार रवींद्र जडेजाने त्याचा त्रिफळा उडवला. माहिश थीक्साना याने सुयशला त्याने 34 धावांवर त्रिफळाबाद केले. दरम्यान, दिनेश कार्तिकने झटपट 34 धावा कुटल्या. मग थीक्साना याने शाहबाज अहमद याचा त्रिफळा उडवून चेन्नईच्या विजयाचा रस्ता मोकळा केला. अहमदने 41 धावांची सुरेख खेळी केली. रवींद्र जडेजाने वानिंदू हसरंगाला तंबूत पाठवले. पाठोपाठ जडेजाने आकाशदीपला बाद केले. हवेत सूर मारून अंबाती रायुडूने त्याचा झेल घेतला तेव्हा सारे स्टेडियम थक्क झाले होते. चेन्नईतर्फे थीक्सानाने 4, जडेजाने 3, तर मुकेश चौधरी आणि ड्वेन ब्राव्हो यांनी 1 गडी टिपला. धावफलक चेन्नई 4 बाद 216. आरसीबी 9 बाद 193.

चेन्नईने टाकली कात

आयपीएलचे चारवेळा अजिंक्यपद संपादलेल्या चेन्नईने यंदाच्या हंगामात आधीच्या चारही सामन्यांत पहिल्या सात ते पंधरा षटकांत सातच्या सरासरीने धावा केल्या होत्या. मात्र, आजच्या सामन्यात त्यांनी हीच सरासरी दहाच्या आसपास राखली. त्यांच्या खेळात झालेला हा फरक लक्षवेधी ठरला.

दुबे-उथप्पाची कमाल

शिवम दुबे याने 46 चेंडूंचा सामना करताना नाबाद 95 धावा ठोकल्या. त्याने पाच चौकार आणि आठ षटकारांचा पाऊस पाडला. तर रॉबिन उथप्पाने 50 चेंडूंत 88 धावा झोडल्या. त्याने चार चौकार आणि नऊ गनगचुंबी षटकारांची आतषबाजी केली. या दोघांच्या फलंदाजीने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

गोंधळलेला आकाशदीप

या लढतीत आकाशदीप सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याच्या 4 षटकांत चेन्नईच्या फलंदाजांनी 58 धावा कुटल्या. एकवेळ तर अशी आली की, गोंधळलेल्या आकाशदीपला चेंडू कुठे आणि कसा टाकावा, हेही कळेनासे झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news