मिरज; जालिंदर हुलवान : येथील मटण-मच्छी मार्केटची दुरुस्ती महापालिका व या व्यावसायिकांमधील वादामुळे रखडली आहे. मार्केटच्या नूतनीकरणासाठी आलेले 60 लाख रुपये पडून आहेत.
जिल्ह्यात सर्वात जास्त मटण सांगली आणि मिरज या दोन्ही शहरांमध्ये विकले जाते. सांगली, मिरजेत मटण विक्री करणारे सुमारे 50 दुकानदार आहेत. त्यापैकी सुमारे 30 दुकानदार मिरजेत आहेत.
संस्थान काळातील हे मार्केट नगरपालिकेने भाडे तत्वावर व्यापार्यांना दिले. नगरपालिका असताना या मार्केटकडे लक्ष दिले जात होते. मात्र आता मार्केटकडे दुर्लक्ष झाल्याने दुरवस्था झाली आहे. महापालिकेने या मार्केटचा लिलाव करण्याचे ठरविले होते. पण येथील व्यावसायिकांनी त्याला विरोध करून भाडेतत्त्वाचीच मागणी केली. पण सध्या महापालिका या दुकानदारांकडून भाडेही घेत नाही आणि मालमत्ता करही घेत नाही. एकीकडे महापालिकेचा कर बुडतो आणि दुसरीकडे दुकानदारांना सुविधा मिळत नाहीत.
मिरजेच्या मच्छी मार्केटमध्ये मासे विकणारे सुमारे 14 व्यावसायिक आहेत. सुमारे 40 वर्षांपासून येथे मच्छी मार्केट आहे. तत्कालीन नगरपालिकेने ठराव करूनच भाडेतत्त्वावर हे मार्केट दिले आहे. या व्यावसायिकांकडूनही भाडे भरून घेतले जात नाही. येथील व्यावसायिकांनी महापालिकेकडे लेखी व तोंडी अनेकदा मागणी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मार्केट सुस्थितीत केल्यास व्यावसायिकांनाही त्याचा फायदा होईल, स्वच्छता राहील आणि महापालिकेलाही उत्पन्न मिळेल.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 60 लाखाचा निधी या मच्छी व मटण मार्केटसाठी दिला होता. त्या कामाचे टेंडर काढून ठेकेदारही निश्चित झाला होता. मात्र त्यानंतर काम झाले नाही. हे काम त्वरित सुरू करण्याची मागणी आहे.