उत्तर महाराष्ट्र

नाशिक : खळवाडी परिसरामध्ये विहिरीत आढळला मृतदेह

अंजली राऊत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
येथील खळवाडी परिसरातील विहिरीत शनिवारी (दि. 4) दुपारी 1.30च्या सुमारास कुजलेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

खळवाडी परिसरात सुनील गोपीचंद गवळी यांची विहीर असून, दुपारच्या सुमारास त्यांना विहिरीत दुर्गंधी येत आल्याने त्यांनी विहिरीत जाऊन डोकावले असता, त्यांना पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. त्यांनी तत्काळ सिन्नर पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने ओळख पटत नव्हती. मृतदेह अंदाजे 25 ते 30 वर्षीय तरुणाचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृतदेहाला नगर परिषदेच्या दवाखान्यात नेत शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेहाच्या एका हातावर दत्तात्रेय भोईराज, तर दुसर्‍या हातावर मोरया अशी नावे गोंदलेली आहेत, तर हाताच्या एका भागावर माश्याचे चित्र, ओम व त्रिशूळाचे चित्र गोंदलेले आहे. मृतदेहाच्या अंगावर भगव्या रंगाचा शर्ट व हिरव्या रंगाची पॅन्ट असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिस करीत आहेत. या वर्णनाची व्यक्ती कुणाच्या ओळखीची असेल, तर सिन्नर पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सचिन चौधरी अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT