उत्तर महाराष्ट्र

नाशिक : आश्रमशाळेच्या शिक्षिकेचा थायलंडमध्ये गौरव

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना काळात सर्वच जग थांबले होते. मुलांचे शिक्षण आणि आरोग्य हा महत्त्वपूर्ण विषय होता. आदिवासी विकास विभागाच्या भिलमाळ येथील आश्रमशाळेतील शिक्षिका अमृता भालेराव यांनी या काळात त्यांचे शिकणे सुरू ठेवले. नुकत्याच थायलंड येथे पार पडलेल्या सोहळ्यात त्यांना गौरवण्यात आले. या सोहळ्यात आशिया खंडातील 11 देशातील फक्त 70 शिक्षकांना गौरवण्यात आले. शिक्षिका भालेराव यांनी 2020 मध्ये एशियन कॉलेज ऑफ टीचर्समध्ये ऑनलाइन स्वरूपातील सर्टिफिकेट कोर्ससाठी प्रवेश घेतला. त्यांनी सहा महिन्यांचा कोर्स चार महिन्यांत विशेष प्रावीण्यासह पूर्ण केला. यामध्ये वर्ग व्यवस्थापन, विविध शैक्षणिक तंत्रे, गरजाधिष्ठित शिक्षण, पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तक निर्मिती, किशोरवयीन मुलांना अध्यापन या बाबीबद्दल ज्ञान मिळवले. हा सर्टिफिकेट कोर्स हा पूर्णतः इंग्रजी भाषेतून होता. या कोर्समुळे भालेराव या जगभरात द्वितीय भाषा शिक्षक म्हणून काम करू शकणार आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करणार्‍या त्या आश्रमशाळेतील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या आहेत. यापूर्वी 26 जानेवारी 2022 रोजी दक्षिण आफ्रिका खंडातील किलीमांजारो शिखर सर करून त्यांनी विक्रम प्रस्थापित केला होता.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT