पुणे : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; 33 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 55 लाखांची घरफोडी | पुढारी

पुणे : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; 33 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 55 लाखांची घरफोडी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लोणीकंद येथील फुलगाव परिसरातील एका किराणा व्यावसायिकाच्या घरातून चोरट्यांनी 33 तोळे सोन्याचे दागिने व 51 लाख रुपयांची रोकड, असा 55 लाख 68 हजार रुपयांचा ऐवज चोरला. ही घटना 10 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत घडली. ते व्यावसायिक मार्केट यार्ड येथे राहत असलेल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले असताना, चोरट्यांनी हा डल्ला मारला आहे. याप्रकरणी, सतीश राका (वय 31,रा. फुलगाव, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : फिर्यादी सतीश राका यांचे किराणा दुकान आहे. वडील, भाऊ आणि ते असे तिघे जण हा व्यवसाय पाहतात. मार्केट यार्ड येथे वास्तव्यास असलेल्या त्यांच्या मामांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी घरातील सर्व जण गेले होते. त्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून पळ काढला. फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

असा आला चोरीचा प्रकार समोर
घरफोडी झालेल्या कालावधीत फिर्यादी व त्यांच्या घरातील सर्व व्यक्ती मार्केट यार्ड येथेच होत्या. फुलगाव शिवारातील एका व्यक्तीला त्यांच्या विहिरीत एक पिशवी मिळाली. त्या पिशवीत फिर्यादींच्या वडिलांचे ओळखपत्र आणि लाईटबिल होते. त्यांनी फिर्यादींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. त्यांचे दुसरे नातेवाईक हडपसर येथे राहतात. त्यांना याबाबत पिशवी सापडलेल्या व्यक्तीने माहिती दिली. त्यांनी फिर्यादींना काही कागदपत्रे विहिरीत आढळून आल्याचे सांगितले. सुरुवातीला फिर्यादींनी 48 तोळे सोने चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. मात्र, घरात व्यवस्थित पाहणी केली तेव्हा, त्यांना 15 तोळे सोने व 75 हजारांची रोकड परत मिळाली.

Back to top button