उत्तर महाराष्ट्र

Nashik 11th Admission : दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर होणार

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नागपूर, नाशिक व अमरावती या शहरांमध्ये इयत्ता अकारावीसाठी शिक्षण विभागाकडून केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, अकरावीच्या पहिल्या फेरीची प्रक्रिया सोमवारी (दि. २६) पूर्ण झाली. त्यानंतर नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, सोमवारी (दि. ३) दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. या फेरीच्या प्रक्रियेला मंगळवार (दि. २७) पासून प्रारंभ झाला आहे. नियमित दुसऱ्या फेरीप्रमाणेच काेटांतर्गत दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक राहणार आहे.

शहरातील ६५ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या २६ हजार ७२० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे. पहिल्या फेरीत ८ हजार १४१ प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यात कोटांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७६२ इतकी आहे. अद्यापही १८ हजार ७३९ जागा रिक्त जागा आहेत. त्यासाठी दुसऱ्या फेरीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुरुवार (दि. २९) पर्यंत अर्जाचा भाग दोन भरून पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 5 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत.

दरम्यान, अद्यापही भाग एक न भरलेल्या विद्यार्थ्यांना दि. ३ ते ५ जुलै या कालावधीत नोंदणी करून भाग एक भरता येणार आहे. मात्र, या कालावधीत भाग एक अनलॉक किंवा दुरुस्ती करता येणार नाही. या फेरीतही प्रथम पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक असेल. अन्यथा संबंधित विद्यार्थ्याला पुढील एका नियमित फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करायचा असल्यास त्यासाठी संबंधित विद्यालयाला विनंती करून आपला प्रवेश करू शकतात. मात्र, ते विद्यार्थीही पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित होतील.

दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक

२७ ते २९ जून : अर्जाचा भाग दोन अर्थात प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, नवीन विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करून अर्ज भाग एक भरून तो प्रमाणित करणे, भाग एकमध्ये दुरुस्ती.

३० जून ते २ जुलै : पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणे, विभागीय कॅप समित्यांकडून अलॉटमेंटचे पूर्वपरीक्षण.

३ जुलै : गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, या फेरीचे कट-ऑफ पोर्टलवर दर्शविणे.

३ ते ५ जुलै : प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारणे.

५ जुलै : प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर ऑनलाइन नोंदविण्यासाठी उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी वेळ.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT