देशाला दुसर्‍या क्रांतीची गरज : के. चंद्रशेखर राव | पुढारी

देशाला दुसर्‍या क्रांतीची गरज : के. चंद्रशेखर राव

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. तरीही शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकर्‍यांना सुखी करण्यासाठी देशात दुसर्‍या क्रांतीची गरज निर्माण झाली आहे. दुसरी क्रांती घडविण्यासाठीच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षास साथ द्यावी, असे अवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री व बीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी केले.

सरकोली (ता. पंढरपूर) येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते भगिरथ भालके, माजी नगरसेवक किरण घाडगे, संतोष नेहतराव, व्यंकट भालके, सुनील धोत्रे यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. त्यांचा सत्कार मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला. यावेळी तेलंगणाचे मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश सरचिटणीस शंकरराव धोंगडे, माणिक कदम यांच्यासह भालके समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री राव म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतीमालास दर मिळत नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे आत्महत्या करीत आहेत. तेलगंणा सरकारने शेतकर्‍याकडे लक्ष दिले आहे. सोयीसुविधा व शासकिय योजनेचा लाभ दिला आहे. शेतकरी अन्नदाता आहे. त्याचे पालन पोषण चांगले होणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांवरील अन्याय, अडचणी दूर करून मदत करण्यासाठी बीआरएस पक्ष मैदानात उतरला आहे. देशात परिवर्तन करण्याची ताकद शेतकरी वर्गात आहे. यासाठी शेतकर्‍यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मतदारांनी बीआरएस पक्षास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री राव यांनी केले.

दरम्यान, सरकोली गाव बीआरएस पक्षाच्या गुलाबी झेंड्यांनी गुलाबी रंगांनी रंगून गेले होते. भगीरथ भालके समर्थकांची उपस्थिती पाहून पश्चिम महाराष्ट्रात भालकेंच्या प्रवेशामुळे वीआरएस वाढणार असल्याचा ठाम विश्वास राव यांनी बोलून दाखवला. बीआरएस ही भाजप अगर काँग्रेसची बी टिम नसून शेतकरी, दिनदलीतांची टिम असल्याचे आगामी निवडणुकांमध्ये दाखवून देवू, असा विश्वास देखील मुख्यमंत्री राव यांनी बोलून दाखवला.

मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. मंदिर समितीने मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांचा सत्कार सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केला. आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागलेली आहे. रांगेतील भाविकांना त्रास होऊन नये आणि राजशिष्टाचार पाळून अवघ्या दहा मिनिटात त्यांनी दर्शन घेतले. पुन्हा दर्शन रांग पूर्ववत झाली.

Back to top button