Vote Jihad Allegation Pudhari
नंदुरबार

Vote Jihad Allegation: ‘वोट जिहाद’च्या आरोपाला रघुवंशी यांचे प्रत्युत्तर; नंदुरबारमध्ये शिवसेनेचा विजयोत्सव

लोकसेवा केली म्हणूनच सत्ता मिळाली; हिंदुत्वावर प्रश्न विचारणाऱ्यांना जाहीर आव्हान

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : भाजपाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नंदुरबार नगरपरिषद निवडणूक लढवली हे आमच्या फायद्याचे झाले. त्यामुळे आमचे मताधिक्य वाढले. वोट जिहाद केल्याचा आमच्यावर ते आरोप करतात आणि आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उठवतात. पण, लोकसेवा खरोखर केली तरच सत्ता प्राप्त होत असते.

लोकांच्या उपयोगी पडणारे काम करतो म्हणून लोकांनी आम्हाला पाचव्यांदा सत्ता सोपवली. त्या उलट स्वतः गावित परिवाराने असे कोणते काम केले याचे एक तरी उदाहरण दाखवून द्यावे; असे जाहीर आव्हान देत शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी विजयोत्सवाच्या जाहीर सभेत वोट जिहादच्या आरोपाला प्रतिउत्तर दिले.

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार नवापूर शहादा आणि तळोदा या चार नगरपरिषदांची निवडणूक नुकतीच पार पडली असून त्याचा निकाल आठवड्यापूर्वी जाहीर झाला. या निवडणुकीत एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेने भारतीय जनता पार्टी विरोधात भूमिका घेऊन अजित दादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी तसेच शहादा येथे अभिजीत पाटील यांच्या आघाडीशी हात मिळवणी केली होती. परिणामी शिंदे गटाचे समर्थन असलेले नगराध्यक्ष व नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले. त्या सर्वांचा सामूहिक सत्कार आणि जनतेचे आभार मानण्यासाठी काल शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी रात्री उशिरा नंदुरबार येथील सुभाष चौकात भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. त्या जाहीर सभेत विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी बोलत होते.

दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करीत जोरदार घोषणाबाजी केली तसेच फटाक्यांची आतषबाजी देखील केली. याप्रसंगी व्यासपीठावर शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी, अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी, उद्योगपती डॉक्टर रवींद्र चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भरत गावित, राम रघुवंशी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी, शहाद्याचे नगराध्यक्ष अभिजीत पाटील, नवापूरचे नगराध्यक्ष जयवंत जाधव आणि सर्व नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रघुवंशी गटाने वीस वर्षांपासूनची आपली सत्ता राखणारा विजय प्राप्त करण्यात यश मिळवले. तथापि या निकालानंतर पत्रकार परिषदेत बोलताना माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण केले गेल्याचे सांगत, रघुवंशी गटाचा विजय वोट जिहाद चा विजय असल्याचे विश्लेषण मांडले होते. त्या आरोपांना प्रतिउत्तर देत प्रमुख भाषणात चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, लोकसेवा खरोखर केली तरच सत्ता प्राप्त होत असते. लोकांच्या उपयोगी पडणारे काम करतो म्हणून लोकांनी आम्हाला पाचव्यांदा सत्ता सोपवली. असे असताना आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उठवतात. यांनी हिंदुत्वासाठी एक तरी काम केले आहे का, याचे उदाहरण दाखवावे. आम्हाला हिंदुत्वाचे प्रमाणपत्र दाखवण्याची आवश्यकता नाही. कारण आम्ही सातत्याने त्यासाठीच काम करतो.

नंदुरबार शहराच्या सर्व भागात आतापर्यंत 121 लहान-मोठे शिवमंदिर उभारले. विठ्ठलाची भव्य मूर्ती स्थापन केली. यांनी एकही मंदिर उभारलेले नाही. आम्ही जाहीर वचन दिल्याप्रमाणे दीड कोटी रुपये खर्चाचे भव्य शिव उद्यान उभारून दाखवले. छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यासाठी भूमिपूजन केले गेले. काही दिवसात ते काम पूर्ण होईल. त्याचप्रमाणे 30 फूट उंचीची भव्य श्रीराम मूर्ती नंदुरबार शहरात स्थापन केली जाणार असून आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांचा सुद्धा मोठा पुतळा लवकरच स्थापन केला जाणार आहे. नगरपालिका निवडणूक निकाल सिर्फ झाकी है झेडपी अभी बाकी है, असे नमूद करून याप्रसंगी रघुवंशी यांनी सर्व कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागण्याची सूचना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT