उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये घरपट्टीसाठी मनपाचा पुन्हा ‘ढोल बजाव’

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना काळात ठप्प झालेली करवसुली कोरोना सरल्यानंतरही पूर्ण क्षमतेने पूर्वपदावर आली नसल्याने महापालिकेने घरपट्टी थकबाकीदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या अंतर्गत थकबाकीदारांच्या घरांसमोर, आस्थापनांसमोर ढोल बजाव मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, दिवाळी सणानिमित्त या मोहिमेला स्थगिती देण्यात आली होती. मंगळवार (दि. 1) पासून पुन्हा या मोहिमेला सुरुवात होणार असल्याने नाशिकमध्ये पुन्हा ढोलचा आवाज निनादणार आहे.

मनपा प्रशासनाने यंदा थकबाकी वसुली मोहीम अधिक तीव— केली आहे. ढोल बजाव मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 1 लाखापेक्षा अधिक घरपट्टी थकीत असलेल्या 1 हजार 258 थकबाकीदारांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. पहिल्या पाच दिवसांत मनपाच्या सहाही विभागांतील तब्बल 435 घरांसमोर ढोल वाजविण्यात आले. या मोहिमेच्या माध्यमातून सुमारे 4 कोटी 1 लाख 18 हजार 944 रुपयांची थकबाकी वसूल करण्यात महापालिकेला यश आले. मात्र, दिवाळी सणाच्या काळात ढोल बजाव मोहिमेला विविध राजकीय पक्षांसह काही संघटनांनी विरोध दर्शविला होता. मनपा प्रशासनाने सामाजिक भान राखत दि. 22 ते 31 ऑक्टोबर या काळात या मोहिमेला स्थगिती दिली होती.दरम्यान, दिवाळी सरल्यानंतर मंगळवार (दि. 1) पासून पुन्हा ढोल बजाव मोहीम राबविली जाणार आहे. आतापर्यंत 435 थकबाकीदारांच्या घरांसमोर, आस्थापनांसमोर ढोल वाजवून त्यांना थकबाकी भरण्यास तयार करण्यात आले होते. आता उर्वरित 823 थकबाकीदारांच्या घरांसमोर, आस्थापनांसमोर ढोल वाजविण्यात येणार असल्याचे मनपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, मनपाच्या ढोल बजाव मोहिमेवर आम आदमी पार्टीने आक्षेप नोंदवत ही मोहीम बंद करण्याची मागणी केली आहे. मोहीम बंद न केल्यास मनपासमोर ढोल वाजविण्याचा इशारा दिला आहे. त्यातच आता मनपाने पुन्हा ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने 'आप'च्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ढोल बजाओ मोहिमेला दिवाळीमुळे स्थगिती देण्यात आली होती. आता सणोत्सव संपल्याने मंगळवार (दि. 1) पासून पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर थकबाकीदारांनी थकबाकी भरून मनपा प्रशासनाला सहकार्य करावे अन्यथा संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल.
– अर्चना तांबे, अतिरिक्त आयुक्त तथा उपआयुक्त (कर), मनपा

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT