उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये मिटकरींचा निषेध; ब्राह्मण संघटनांचा मोर्चा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका सभेत हिंदू विवाह परंपरा व ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ शहरातील हिंदुत्ववादी व ब्राह्मण समाजाच्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी (दि.27) मोर्चा काढला होता. यावेळी आ. मिटकरींना अटक करण्याची मागणी मोर्चेकर्‍यांनी केली.

बी. डी. भालेकर मैदानापासून बुधवारी दुपारी मोर्चास सुरुवात झाली. 'जय जय परशुराम', 'जय श्रीराम', 'सनातन हिंदू धर्म की जय' अशा घोषणा देत आ. अमोल मिटकरीला अटक करा, अशी मागणी करत ब्राह्मण समाज, हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात सहभागी झालेल्यांनी भगव्या टोप्या व भगवे झेंडे घेतले होते. समाजबांधवाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आ. मिटकरी यांनी केलेल्या विधानाचा व त्यास आ. जयंत पाटील यांनी दाद दिल्याने समाजबांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यावेळी मोर्चेकर्‍यांनी 'जयंत पाटील हाय हाय', 'अमोल मिटकरीला अटक करा' असे फलक हातात घेतले होते.

मोर्चा बी. डी. भालेकर मैदानावरून निघाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत एमजी रोडमार्गे सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप करण्यात आला. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, जयंत पाटील, धनंजय मुंढे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी माजी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, ब—ाह्मण महासंघाचे अध्यक्ष भगवंत पाठक, ज्येष्ठ नेते विजय साने, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, अ‍ॅड. अविनाश भिडे, ब—ाह्मण सभा नाशिकरोडचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, टाकळी संस्थानचे अ‍ॅड. भानुदास शौचे, समीर शेटे, उद्योजक धनंजय बेळे, विजय साने, अ‍ॅड. अभिजित बगदे, अजिंक्य साने आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT