‘मंगळ’स्वप्नही साकारणार? | पुढारी

‘मंगळ’स्वप्नही साकारणार?

‘ट्विटर’वरील मालकीचे स्वप्न पाहून ते अवघ्या काही दिवसांमध्येच साकार करणार्‍या एलन मस्क यांचे दीर्घकालिन स्वप्न आहे मंगळावर मानव वसाहत स्थापन करण्याचे. 2050 पर्यंत पृथ्वीच्या या शेजारच्या ग्रहावर मानव वसाहत स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्नही साकार होणार का, याची जगाला उत्सुकता आहे….

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असलेले एलन मस्क यांनी या मुद्द्याबाबत ट्विटर कंपनीवर सातत्याने टीका केली होती. त्यामुळे कुणी तरी त्यांना ‘तुम्ही ट्विटर खरेदीच का करीत नाही?’ असा सवाल विचारला होता आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या या माणसाने ते करूनही दाखवले! ‘टेस्ला’ आणि ‘स्पेस एक्स’सारख्या दिग्गज कंपन्यांचे सर्वेसर्वा असलेल्या या धडाडीच्या माणसामध्ये भव्य स्वप्नं पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची धमक आहे. मात्र, या माणसाने जे मुलखावेगळे स्वप्न पाहिलेले आहे ते पूर्ण होईल की नाही, याची अवघ्या जगालाच शाश्वती वाटत नाही. हे स्वप्न म्हणजे मंगळावर मानव वसाहत स्थापन करण्याचे. मात्र, याद़ृष्टीनेही मस्क यांची ठोस पावले पडत आहेत आणि आता तर त्यांनी मंगळ प्रवासासाठी एका माणसाला किती रुपयांचे तिकीट खरेदी करावे लागेल, हेही सांगून टाकले आहे. त्यामुळे जग आता या ध्येयवेड्या माणसाच्या ‘खुळ्या’ स्वप्नाकडे गांभीर्याने पाहू लागले आहे.

सध्या अंतराळ प्रवासाबाबत अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ ही मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ या कंपनीवरच अवलंबून आहे. ‘नासा’ची ‘डिस्कव्हरी’सारखी अंतराळयाने आता निवृत्त झालेली असून ‘नासा’कडे अंतराळ प्रवासासाठी एकही यान नाही. अंतराळस्थानकावर जाण्यासाठी अमेरिकेच्या अंतराळवीरांना रशियाच्या ‘सोयूझ’ यानावर किंवा मग मस्क यांच्या ‘ड्रॅगन’ कॅप्सूलवरच अवलंबून राहावे लागते. पुनर्वापर करता येण्यासारखे ‘फाल्कन-9’ रॉकेट, अंतराळवीरांना घेऊन जाणारे ‘ड्रॅगन’ कॅप्सूल असो किंवा जगाला किफायतशीर दरात वेगवान इंटरनेट देण्याच्या महत्त्वाकांक्षेने अवकाशात सोडलेल्या हजारो ‘स्टारलिंक’ सॅटेलाईटस्चे जाळे असो, ‘स्पेस एक्स’ने जगभरात आपल्या उत्तुंग कामगिरीचा दबदबा निर्माण केलेला आहे.

मस्क यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी व ‘अ‍ॅमेझॉन’चे प्रमुख जेफ बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीलाही ‘स्पेस एक्स’शी स्पर्धा करीत असताना दमछाक होत असते. चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची, भव्यदिव्य स्वप्ने पाहण्याची व ती पूर्ण करण्यासाठी चिकाटीने मेहनत घेण्याची मस्क यांची खासियतच ‘स्पेस एक्स’च्या यशामागे दडलेली आहे. त्यामुळेच मंगळावर मानव वसाहत स्थापन करण्याच्या त्यांच्या संकल्पनेची अनेकांनी खिल्ली उडवलेली असली, तरी भविष्यात ते घडूही शकते, असे आता म्हटले जात आहे. टीईडी कॉन्फरेसेजचे प्रमुख ख्रिस अँडरसन यांच्याशी बातचित करीत असताना मस्क यांनी या मोहिमेबाबत खुलेपणाने विचार मांडले. या मोहिमेतील संभाव्य धोक्यांचाही त्यांनी मोकळेपणाने ऊहापोह केला, हे विशेष! याचा अर्थ ही मोहीम म्हणजे केवळ सुंदर कल्पनाविलास नसून ती वास्तववादी वैज्ञानिक मोहीम आहे, हे दिसून येते.

ही मोहीम दुबळ्या मनाच्या माणसांसाठी नाही, त्यासाठी वाघाचे काळीजच हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी 2050 पर्यंत मंगळावर मानव वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न पाहिलेले आहे. त्यासाठी ‘स्पेस एक्स’ कंपनी असे रॉकेट विकसित करीत आहे, जे अत्यंत वेगाने व सुरक्षितपणे अनेक लोकांना मंगळावर पोहोचवू शकेल. मंगळावर जाण्यासाठीचे एकतर्फी तिकीट एक लाख डॉलर्सचे असेल, असे त्यांनी सांगितले. सर्वांसाठी ही मोहीम ‘किफायतशीर’ ठरावी, यासाठीही आपण प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मंगळावर लोकांना घेऊन जाण्यासाठी एक हजार ‘स्टारशिप’ यान व रॉकेट तयार केले जातील. 2030 ते 2040 दरम्यान दर दोन वर्षांनी काही निश्चित संख्येने त्यांना लाँच केले जाईल. प्रत्येक ‘स्टारशिप’मध्ये शंभरपेक्षा अधिक लोक बसू शकतील.

मंगळावर गेलेल्या सुरुवातीच्या लोकांना बरीच मेहनत घ्यावी लागेल, असेही मस्क यांनी म्हटले आहे. ही सुरुवात ‘शानदार’ नक्कीच असणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या माणसाची धडाडी आणि आजपर्यंतचा प्रवास पाहिला, तर भविष्यात त्याच्याकडून ही थक्क करणारी कामगिरीही घडू शकेल, असे म्हणण्यास निश्चितच वाव आहे.

– सचिन बनछोडे

Back to top button