उत्तर महाराष्ट्र

‘एमएच-15 सायक्लोथॉन 2022-23’ शनिवारी रंगणार

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाहतूक नियमांची अंमलबजावणी, हेल्मेटचा वापर आणि दिवसागणिक वाढणारे प्रदूषण याविषयी जनजागृती करण्यासाठी एसएम एज्युकेशन सोसायटी संचलित ग्लोबल व्हिजन स्कूलच्या वतीने येत्या शनिवारी (दि. 17) 'एमएच-15 सायक्लोथॉन 2022-23'चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या माध्यमातून आनंदी जीवन जगण्याचा संदेश दिला जाणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी दिली.

'एमएच-15 सायक्लोथॉन 2022-23'ची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ग्लोबल व्हिजन स्कूल-त्रिमूर्ती चौक-सिटी सेंटर मॉल-एबीबी सर्कल-आयटीआय सिग्नल- माउली लॉन्स-अंबड प्रॉपर्टी ऑफिस पुन्हा ग्लोबल व्हिजन स्कूल असा रॅलीचा 11 किलोमीटरचा मार्ग असणार आहे. या रॅलीसाठी नूतन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, प्रसिद्ध धावपटू शीतल संघवी, आयर्नलेडी अश्विनी देवरे, डॉ. पल्लवी धात्रक, किरण चव्हाण आदी उपस्थित राहणार असल्याचे मणेरीकर यांनी सांगितले. सायक्लोथॉन रॅलीमध्ये 18 ठिकाणी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे स्वयंसेवक असणार आहेत. तसेच सेल्फी पॉइंट, फिनिशर स्टँड, वेलकम गेट, प्रोग्राम स्टेज आदी सुविधा असणार आहेत. रॅलीतील सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी 12 ठिकाणी चिअर्स ग्रुप तैनात राहणार आहे. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे मणेरीकर यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला नाशिक सायकलिस्टचे उपाध्यक्ष पवार, सदस्य मृणाल क्षीरसागर, अमोल भंदुरे, अनिल राऊत आदी उपस्थित होते.

नावनोंदणीला प्रतिसाद…
12 वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांना सायक्लोथॉनमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यासाठी नावनोंदणी बंधनकारक आहे. नावनोंदणी प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सुमारे 150 विद्यार्थी-पालकांनी नोंदणी केली आहे. रॅलीत सुमारे 300 विद्यार्थी-पालक सहभाग नोंदवतील, असा अंदाज आयोजकांनी वर्तविला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT