भाजपातील कर्डिले यांचा ‘दम’दमा.. फोन इन कार्यक्रम व्हायरल | पुढारी

भाजपातील कर्डिले यांचा 'दम'दमा.. फोन इन कार्यक्रम व्हायरल

संदीप रोडे :

आठवड्यातच राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी खड्ड्यांच्या प्रश्नावरून उपोषणास्त्र डागत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर निशाणा साधण्यासोबतच भाजपला घेरण्याचं पहिलं पाऊल टाकलं. त्या उपोषणास्त्राची धूळ खाली बसते न बसते, तोच पुन्हा भाजपातील कर्डिले यांचा ‘दम’दमा फोन इन संवाद व्हायरल झाला. स्वपक्षातीलच युवा नेत्याला साहेबांनी झलक ऐकवली. हा युवा नेता दुसरा-तिसरा कोणी नसून भाजपचे दिवंगत खा. दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी आहेत. त्यांनी ऑडिओतील आवाज आपलाच असल्याचे स्पष्टीकरण पोलिसांना दिले आहे. त्या ऑडिओतील भाष्य ऐकता ‘साहेबां’च्या स्वभावाचा इतिहास नगरकरांच्या मनी ताजातवाना झाल्याशिवाय राहत नाही. आता हा ‘दम’दमा सिलसिला कुठपर्यंत जाणार, की पेल्यातील वादळ ठरणार, याची उत्सुकता नगरकरांना आहे!

राहुरी मतदारसंघाचे विद्यमान आ. प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय मैदानातील पाठीराखे बाजूला सारत त्यांचे सत्तासंस्थान खालसा करण्याची रणनीति तनपुरे विरोधक माजी आमदार शिवाजी कर्डिले आखत आहेत. नगर शहरानजीकचे बुर्‍हाणनगर हे कर्डिलेंचे होमटाऊन. राहुरीचे युवा नेते धीरज पानसंबळ तर नागरदेवळेचे महेश झोडगे यांना सोबतीला घेत कर्डिले पुन्हा राहुरीची बांधणी करण्यास निघाले आहेत. त्यातच राज्यातील ‘मविआ’ची सत्ता खालसा होत भाजप सत्तेत आल्याने अन् त्यातही राधाकृष्ण विखे पाटलांना हेवी वेट महसूल खातं मिळाल्याने जिल्हा भाजपचे हौसले जसे बुलंद झाले, तसे कर्डिलेंनाही हा बदल बळ देणारा ठरला आहे. राज्यातील हा सत्ताबदल कर्डिले यांच्यासाठी ‘संधी’ ठरू पाहत असतानाच ऑडिओ बॉम्बने खळबळ उडविली आहे.

राज्यातील सत्तेच्या संधीतून विरोधक तनपुरेंना राजकीय मैदानात एकाकी पाडण्याच्या नादात कर्डिले स्वत:च गोत्यात येतात की काय? अशी परिस्थिती त्या ऑडिओ बॉम्बने निर्माण झाल्याचे वातावरण निर्माण होऊ पाहते आहे. तनपुरे यांच्याशी सलगी असणारे अ‍ॅड. अभिषेक भगत यांची भाजपचे युवा नेते दिवंगत खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र यांच्याशी मैत्री आहे. भगत हेही बुर्‍हाणनगरचे रहिवासी. गावकारभारातील ढवळाढवळीमुळे कर्डिले-भगत यांचे फारसे सख्य नाही. सुवेंद्र गांधी हे त्याच भगत यांना सोबत घेत उठबस करतात. ही बाब कर्डिले यांना खटकली, अन् त्यांची सटकली.

भगत यांना पाठबळ देवू नका, हे सांगण्यासाठी कर्डिले यांनी सुवेंद्र गांधी यांच्याशी ‘फोन इन’ संवाद साधला. पण समजूतदार, मवाळ भाषेत बोलणे हा कर्डिलेंचा स्वभावच नाही. मनात एक अन् ओठात दुसरेच असंही त्यांचं काही नसतं. जे असेल ते रोखठोक अन् उघडपणे, असा कर्डिलेंचा बाणा. याच स्वभावातून कर्डिलेंनी गांधींचा ‘दम’दमा फोन इन कार्यक्रम केला (कदाचित हेतू तसा नसेलही). पुढे त्याचे इतके राजकीय भांडवल होईल, याची पुसटशी कल्पना कर्डिलेंना नसेलही. असेल तरी ते परिणामाची चिंता न करता रोखठोक भूमिका घेतात, मग त्यातून उद्भवणार्‍या परिणामांना सामोरे जाण्याचीही त्यांची तयारी असतेच असते. त्यांचा हा स्वभाव स्वपक्षाबरोबरच अन्य राजकीय पक्षातील नेत्यांनाही ठाऊक.

2019 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाला विखेंनाच जबाबदार धरत थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचणार्‍यांमध्ये कर्डिलेच अग्रभागी होते. इतकंच काय तर फडणवीस यांच्याकडे पक्षाने नगर जिल्ह्याचे पालकत्व दिल्यानंतर अन् राज्यात शिंदे-फडणवीस सत्ता आल्यानंतर मुंबईतील ‘खास’ बैठकीत मंत्री विखे पाटलांसमोर रोखठोक भूमिका मांडणारेही कर्डिलेच होते. कोणाचीही भीडभाड न ठेवणारे कर्डिले हे सुवेंंद्र यांना तरी कसे जुमानणार. भगताच्या किड्याला पाठिशी घातले तर नीट करून काढीन. केस, गुन्हा होईल, आम्हाला काही फरक पडत नाही, अशा आक्रमक भाषेत कर्डिलेंनी सुवेंद्र यांना दम भरला.

‘जे सत्य आहे, ते समाजापुढे आणले आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती शहरात व जिल्ह्यात खपवून घेणार नाही, जय श्रीराम!’ अशी भूमिका प्रत्युत्तरादाखल सुवेंद्र गांधी यांनी मांडली आहे. पितृछत्र हरपल्यानंतर सुवेंद्र हे पहिल्यांदाच अशा प्रसंगाला सामोरे जात आहेत. दिवगंत खासदार दिलीप गांधी व त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी परिवाराची नगर शहरासह जिल्ह्यात (विशेष करून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात) हक्काची ‘वोट बँक’ आहे, हे दुर्लक्षून कसे चालेल.

लांडे खून प्रकरण, एसपी ऑफिस हल्ला प्रकरणात कर्डिले आरोपांचे धनी झाले. त्यानंतरही त्यांचा आक्रमक बाणा काही केल्या जात नाही, हेच पुन्हा एकदा दिसून आले. कोणी किती अन् काही म्हणले तरी त्याची पर्वा न करता स्वमर्जीने राजकारण करणारे कर्डिले गांधींच्या भूमिकेने अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. सुवेंद्र यांनी ‘ऑडिओ क्लिप’मधील आवाज आपलाच असून कर्डिले- गांधी यांच्यातील तो संवाद असल्याचे स्पष्टीकरण दिल्याने हा वाद वेगळ्याच वळणावर जाण्याची शक्यता व्यक्त होतेय. त्यातच तक्रार बेदखल झाल्याने भगत हे आता लढ्यासाठी कोर्टाच्या पायरीवर पाऊल टाकण्याच्या तयारीत आहेत. क्लीपमधील तो आवाज आपला नाहीच, अशी भूमिका माजी आमदार कर्डिलेंनी घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुवेंद्र गांधीसोबत संवाद साधणारा दुसरा कोण? हे शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर असेल.

बॅकग्राऊंड साऊंड अन् पोलिस दाखवतील का धारिष्ट्य

सर्वत्र चर्चेत आलेली ऑडिओ क्लीप एकाग्रतेने ऐकल्यास त्यात बॅकग्राऊंड साऊंड ऐकावयास येतो. तो आवाज भाजपमधील एका मातब्बर नेत्याचा असल्याची बाब चटकन लक्षात येते. त्या अर्थी ज्या ठिकाणाहून हा ‘दम’दमा फोन इन कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी हा नेता उपस्थित असल्याचे अधोरेखित होते. यदाकदाचित ऑडिओ अंगलट आलाच तर बचावासाठी साहेबांनी त्या नेत्याच्या बैठक ठिकाणाचा सहारा घेतला तर नसेल ना,अशीही अटकळ बांधली जात आहे. आता कथित ऑडिओ प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली असली तरी ‘त्या मातब्बर’ नेत्याची चौकशी करण्याचे धारिष्ट्य पोलिस दाखवतील का? हा खरा प्रश्न आहे.

…तर ‘सोधा’ लाही बसेल फटका

मुळात अ‍ॅड. अभिषेक भगत यांची सुवेंद्र गांधींसोबतची मैत्री कर्डिलेंच्या जिव्हारी लागण्याचे इंगित काय? कर्डिलेंचे राजकीय विरोधक आ. प्राजक्त तनपुरेंशी असलेली उठबस सोडली तर दखल घ्यावी इतके मोठे राजकीय प्रस्थ भगत नक्कीच नाही, हे तितकेच खरे. तरीही कर्डिलेंनी भगत यांची दखल घ्यावी, हे न उलगडणारे कोडे. त्यासाठी सुवेंद्र गांधी यांना सज्जड दम भरावा, परिणामाची ‘नीट’ जाणीव करून द्यावी, हे कोणत्याच राजकीय पक्षाच्या संहितेत न बसणारे. याच मुद्यावरून भविष्यात सुवेंद्र यांची पाठराखण करणार्‍यांचा आकडा वाढला तर ‘सोधा’लाही त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही, हे दुर्लक्षून चालणार नाही.

Back to top button