इंदापूर : प्रचार पोहचला शिगेला; पदयात्रा, बैठका, कोपरा सभांवर जोर

इंदापूर : प्रचार पोहचला शिगेला; पदयात्रा, बैठका, कोपरा सभांवर जोर
Published on
Updated on

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींमध्ये सध्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका सुरू असून, प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. पदयात्रा, कोपरा सभा, मतदारराजाची भेट, चिन्हाची ओळख, बैठकींवर जोर देत गावात-वाड्यावर प्रत्येक घरोघरी पॅनेलचे प्रमुख उमेदवार व कार्यकर्ते जात आहेत. मतदार शेतात असल्यामुळे उमेदवारांची अडचण होत असून, त्यांना भेटण्यासाठी दमछाक होत आहे. ऐन हिवाळ्यात गुलाबी थंडीत इंदापूर तालुक्यातील निवडणुकीच्या गावांमध्ये चांगलेच राजकीय वातावरण गरमागरम तापल्याचे चित्र दिसून येत आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असतानाच काही मतदारांना रोजच जेवण देऊन खूष केले जात आहे. दोन्ही गटांतील जेवणावळीसाठी मतदार हजेरी लावत असल्याने नेमके मतदार आपल्याकडे आहेत की दुसरीकडे, याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम वाढला आहे. निवडणुका लागलेली अनेक गावे ही आठवडे बाजार, रोजचे व्यवहार आणि बसण्या-उठण्यासाठी इंदापूर शहरात येत असतात. या ठिकाणी हॉटेल व ढाब्यांवर ओल्या पार्ट्या होत असताना दिसून येत असून, हॉटेल आणि ढाबे हाऊसफुल्ल होऊ लागले आहेत. यंदा सरपंचपदासाठीची निवडणूक स्वतंत्र होणार आहे. त्यामुळे चुरस लागली आहे.

काही झाले तरी चालेल, सरपंच आपलाच झाला पाहिजे, या ईर्षेने पार्टीप्रमुख पेटलेले दिसून येत आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाचा पाया मानली जाते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व निर्माण झाले पाहिजे, या भावनेने अनेक राजकीय नेतेमंडळी आता कामाला लागली आहेत. यात गावनेत्यांचा मात्र मोठा कस लागला असून, ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी व जनतेतून सरपंच निवड असल्याने सरपंच देखील आपल्याच बाजूचा व्हावा, यासाठी रात्रंदिवस पळापळ चालू असल्याचे दिसून येत आहे.

गावकी-भावकीला आले महत्त्व
इंदापूर तालुक्यातील एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नसल्याने सर्वत्रच मतदारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद याबरोबरच आता भावकीतील जुने वाद, शेताच्या बांधाचे वाद उकरून काढून त्याला फुंकर मारण्याचा प्रकार सुरू झाला आहे. याने तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न मोडले होते, त्याने तुमच्याबाबतीत न्यायालयात साक्ष दिली होती, अशा पद्धतीचे आरोप-प्रत्यारोप करून मतदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दोन माजी मंत्र्यांचा लागतोय कस
गावांमध्ये वर्षानुवर्षे रखडलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी आणि मतदारांना विश्वास देण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना अर्थात आमदार आणि माजी मंत्र्यांना आपला जोर दाखवावा लावत आहेत. या प्रचाराच्या तोफा 17 डिसेंबरला थंडावणार आहेत. 18 डिसेंबरला मतदान होणार असल्याने राहिलेल्या तीन दिवसांत जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहचण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब उमेदवारांकडून सुरू झाला आहे. माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कस लागला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news