Jalgaon Municipal Election Result Pudhari
जळगाव

Jalgaon Municipal Election Result: जळगावात महायुतीचा कॅश क्रॉप भाजपची बाजी शिंदे गटाचाही झेंडा

१८ पैकी ८ ठिकाणी भाजपचे कमळ ६ जागी शिंदे गटाचा विजय शरद पवार आणि ठाकरे गटाचेही खाते उघडले

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या निवडणुकीचा धुरळा अखेर शांत झाला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या रणसंग्रामात जिल्ह्याने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला असला, तरी काही ठिकाणी धक्कादायक निकालही पाहायला मिळाले आहेत. जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने ८ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ६ जागांवर कब्जा मिळवत जिल्ह्यात आपली ताकद वाढवली आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटानेही जिल्ह्यात आपलं खातं उघडत महायुतीला इशारा दिला आहे.

रावेर लोकसभेत भाजप-शिंदे गटाचा 'क्लीन स्वीप'

रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या नगरपालिकांमध्ये भाजपने आपली पकड मजबूत ठेवली आहे. जामनेर, शेंदुर्णी, रावेर, सावदा आणि फैजपूर या पाच महत्त्वाच्या ठिकाणी भाजपने विजयाचा गुलाल उधळला आहे. गिरीश महाजन यांच्या जामनेर बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा कमळ फुलले असून शेंदुर्णीतही वर्चस्व कायम राहिले आहे. दुसरीकडे, मुक्ताईनगरमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेने बाजी मारली आहे. यावलमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विजय मिळवत जिल्ह्यात खाते उघडले आहे, तर वरणगावमध्ये अपक्ष उमेदवाराने सर्वांनाच बुचकळ्यात पाडले आहे.

जळगाव लोकसभेत शिंदे गटाची सरशी

जळगाव लोकसभा क्षेत्रातील निकालांनी शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा दिलासा दिला आहे. अमळनेर, चोपडा, पारोळा, पाचोरा आणि भडगाव या पाच ठिकाणी शिवसेनेचे (शिंदे गट) लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आले आहेत. आमदारांच्या कार्यक्षेत्रात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली आहे. तर चाळीसगाव, एरंडोल आणि नशिराबाद या तीन महत्त्वाच्या नगरपालिकांमध्ये भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. भुसावळमध्ये भाजपला नगरसेवक संख्येत यश आले असले तरी नगराध्यक्ष पदावर शरद पवार गटाने (तुतारी) कब्जा मिळवत धक्का दिला आहे.

धरणगावात 'स्थानिक आघाडी'चा करिष्मा

जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या धामधुमीत धरणगाव शहर विकास आघाडीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पक्षाच्या चिन्हापेक्षा स्थानिक विकास आणि चेहऱ्यावर विश्वास ठेवत धरणगावकरांनी विकास आघाडीच्या नगराध्यक्षाला पसंती दिली आहे.

भारतीय जनता पक्ष (BJP) ०८

जामनेर, चाळीसगाव, रावेर, एरंडोल, सावदा फैजपूर शेंदुर्णी नशिराबाद

शिवसेना (शिंदे गट) ०६

पाचोरा, चोपडा, मुक्ताईनगर, अमळनेर, पारोळा भडगाव

शिवसेना (ठाकरे गट). ०१

यावल

राष्ट्रवादी (शरद पवार गट) ०१. भुसावळ

स्थानिक आघाडी / अपक्ष. ०२

धरणगाव, वरणगाव

एकूणच निकालाचा कल पाहता, जळगाव जिल्ह्यात 'महायुती'चेच पारडे जड राहिले आहे. मात्र, भुसावळ आणि यावलमधील विजयामुळे महाविकास आघाडीने जिल्ह्यात आपले अस्तित्व प्रकर्षाने जाणवून दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT