

जळगाव (भुसावळ): येथील नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. तहसील कार्यालयातील मतमोजणी केंद्रावर तैनात कर्मचारी व पोलीस प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.
रविवार (दि.21) रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर माहिती संकलनासाठी आलेल्या पत्रकारांना मुख्य प्रवेशद्वारावरच पोलिसांनी अडवले. मोबाईल फोन आत नेता येणार नाही, अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलीस निरीक्षक वाघ यांनी प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांना मीडिया कक्षात प्रवेश देण्यात आला.
मात्र, हा गोंधळ येथेच थांबला नाही. पत्रकार मीडिया कक्षात असतानाच एका महिला कर्मचाऱ्याने तेथे येऊन पत्रकारांना परवानगी नसल्याचे सांगत त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. प्रांताधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशांची माहिती कर्मचाऱ्यांना नसणे किंवा त्या आदेशांकडे दुर्लक्ष होणे, हा प्रशासकीय विसंवाद उघड करणारा प्रकार ठरला.
प्रवेशद्वारावर गर्दी; पोलिसांचे अपुरे नियोजन
दरम्यान, विविध प्रभागांतील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश देताना मुख्य प्रवेशद्वारावर मोठी गर्दी झाली. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडे कोणतेही ठोस नियोजन नसल्याचे दिसून आले. त्यामुळे गोंधळ अधिक वाढला असून मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण सैल असल्याचे चित्र समोर आले.
या संपूर्ण प्रकारामुळे माध्यम प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर अशा अडथळ्यांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.