जळगाव: "राज्यातील महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला युतीचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या आदेशाचे 'पथ्य' पाळून जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) पूर्ण ताकदीनिशी एकत्र लढणार आहेत," अशी अधिकृत घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज केली. जळगाव शहरात बुधवारी (२४ डिसेंबर) सायंकाळी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, अर्ज भरण्याचे दोन दिवस पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, भाजप खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, माजी महापौर नितीन लड्डा आणि शहर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांसारख्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.
या बैठकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात युती करण्यावर एकमत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबतही चर्चा करून महायुती म्हणून एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागावाटपाचा नेमका 'फॉर्म्युला' अद्याप जाहीर झालेला नसला, तरी लवकरच तो निश्चित केला जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. "जागावाटप करताना निवडून येण्याची क्षमता हाच निकष असेल," असेही त्यांनी सूचित केले.
राज्यात शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीबाबत विचारले असता, गुलाबराव पाटील यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. "दोन्ही पक्ष एकत्र आले, हे चांगलेच झाले," असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.
महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात समन्वय झाला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सोबत घेण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन जळगाव शहराच्या विकासासाठी आणि विजयासाठी सामायिक रणनीती आखणार आहेत.