

जळगाव: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध दाखल्यांसाठी इच्छुक उमेदवारांची महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत मोठी गर्दी होत आहे. विशेषतः महापालिकेची थकबाकी नसल्याचा दाखला, शौचालय वापराचा दाखला तसेच शासकीय ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उमेदवारांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे महापालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचा दाखला असणे बंधनकारक आहे. यात मालमत्ता कर, पाणीपट्टी व अन्य शुल्कांचा समावेश होतो. याशिवाय उमेदवार शासकीय ठेकेदार नसावा तसेच स्वतःच्या निवासस्थानी शौचालयाचा वापर करत असल्याचा दाखला सादर करणेही आवश्यक आहे. या तिन्ही महत्त्वाच्या दाखल्यांसाठी सध्या संबंधित विभागांबाहेर इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मर्यादित असल्याने कागदपत्रे वेळेत मिळवण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे. मात्र, अपुरा कर्मचारी वर्ग आणि जुन्या थकबाकीच्या नोंदी तपासण्यात लागणारा वेळ यामुळे दाखले मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सकाळपासून रांगेत उभे आहोत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे, पण तांत्रिक अडचणींमुळे दाखले मिळत नाहीत. प्रशासनाने स्वतंत्र खिडक्या सुरू करून ही प्रक्रिया वेगवान करावी
इच्छुक उमेदवार
थकबाकी तपासणी आणि दाखले वितरित करण्यासाठी उपलब्ध असलेल्या खिडक्यांची संख्या अपुरी पडत असून, महापालिकेने तातडीने अतिरिक्त कर्मचारी आणि खिडक्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रक्रिया सुलभ आणि जलद केल्यास इच्छुक उमेदवारांना वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करणे शक्य होईल, अशी अपेक्षा इच्छुक उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.